१२ ते १४ वयोगटासाठी
लसीकरण कार्यक्रम मार्चपासून
केंद्र व राज्य सरकारांकडून अधिक सतर्क होत, विविध उपाय योजनांची अंमलबाजवणी केली जात आहे. याचच एक भाग म्हणजे १०० टक्के लसीकरणावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण लवकरच सुरू केले जाण्याचे संकेत मिळाले आहेत. १२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण कार्यक्रम मार्चपासून सुरू होणार आहे, लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या COVID-19 कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी माहिती दिली.
पंजाब विधानसभा निवडणुकांसाठी
आता २० फेब्रुवारीला मतदान
पंजाब विधानसभा निवडणुकांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. परंतु पंजाब सरकारच्या विनंतीवरून निवडणूक आयोगाने आता राज्यात २० फेब्रुवारीला मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार आणि विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती, ती विनंती स्वीकारत निवडणूक आयोगाने नवीन तारीख दिली आहे. विशेष म्हणजे पंजाबमधील सर्व ११७ जागांसाठी १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार होते, ते मतदान आता २० तारखेला होईल.
शेकापचे ज्येष्ठ नेते
प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन
शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N. D. Patil) यांचे आज सोमवारी निधन झाले. प्रकृती बिघडल्याने कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय
विमानतळावर दोन स्फोट
संयुक्त अरब अमिराती मध्ये मोठा हल्ला झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दोन स्फोट झाले. ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्फोटांनंतर विमानतळावरही आगीचे लोळ दिसून आले. स्फोटानंतर तीन टँकरनी पेट घेतला असून ड्रोनद्वारे हल्ला करून स्फोट घडवण्यात आला, असा अंदाज विमानतळ प्राधिकरणानं वर्तवला आहे.
मृत्यूंजय दूत संकल्पनेमुळे
वाचले ८१५ जणांचे जीव
राज्यातील महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या अपघातात काहींना प्राण गमवावे लागतात किंवा गंभीर जखमी होतात. अशा अपघातग्रस्तांना तत्काळ प्रथमोपचार मिळावे, यासाठी महामार्ग पोलिसांनी मृत्यूंजय दूत संकल्पना राबविली. १ मार्च २०२१ पासून राबविलेल्या या संकल्पनेतून डिसेंबर २०२१ पर्यंत ८१५ जणांचे जीव मृत्यूंजय दूतांनी वाचविले आहेत. महामार्गांलगतच्या गावातील ग्रामस्थ, पेट्रोल पंप व ढाब्यावर काम करणारे कर्मचारी, सामाजिक संस्थाचा समावेश मृत्यूंजय दुतांमध्ये आहे.
शिफ्ट संपल्याचं सांगत
वैमानिकाचा उड्डानास नकार
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमान काही कारणाने मध्येच एका ठिकाणी उतरवण्यात आलं. मात्र त्यानंतर पुन्हा उड्डाण करण्यास वैमानिकाने नकार दिला. वैमानिकाने शिफ्ट संपल्याचं सांगत या क्षणापासून पुढे मी विमान उडवणार नाही असं सांगत काम करण्यास नकार दिला. त्यानंतर विमानातील प्रवासी चांगलेच संतापले. विमानामध्ये वैमानिकाने ही अगदीच अनपेक्षित घोषणा केल्यानंतर फारच गोंधळ उडाला.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना
‘नाम फाउंडेशन’ च्यावतीने मदत
राज्य परिवहन विभागाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी अडीच महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. संपामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन मिळालेले नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कर्मचाऱ्यांना मदत व्हावी यासाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या ‘नाम फाउंडेशन’ च्यावतीने धुळ्यातील २५० संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
अभिनेत्री भावनाला मारहाण
राज्य सरकारची याचिका स्वीकारली
केरळ उच्च न्यायालयाने मल्याळी अभिनेत्री भावना मेननला मारहाण झाल्याच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने दाखल केलेली याचिका स्वीकारलीय. ही याचिका दाखल करुन घेण्यात आल्यानंतर तीन साक्षीदारांचा जबाब पुन्हा नोंदवण्यात येणार आहे. तसेच पाच नवीन साक्षीदारांचा जबाब नोंदवून घेण्यास सांगण्यात आलंय. या प्रकरणामध्ये दाक्षिणात्य चित्रपटांमधील मोठं नाव असणाऱ्या गोपालकृष्णन् पद्मनाभ म्हणजेच दिलीप नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याचं नाव आरोपी म्हणून असल्याने त्याच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.
राज्यातला कोरोना रुग्णांचा
आकडा 40 हजारांच्या पुढे
राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा सतत 40 हजारांच्या पुढे आहे. कालच्या तुलनेत आजची राज्यातली कोरोना रुग्णांची आकडेवारी किंचीत घटली असली तरी आजही राज्यात 41 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चोवीस तासात राज्यात 41 हजार 327 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 40 हजार 386 कोरोना रुग्ण बरे झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात आज 29 कोरोना रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा 1 हजार 738 वर पोहोचला.
नाशिकमध्ये 16 कोविड
केअर सेंटर पुन्हा सुरू
राजकारण्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांनी बासनात गुंडाळून ठेवलेले प्रतिबंधक नियम, जिल्ह्यात कोरोना निर्बंध लागू करण्यात केलेला चालढकलपणा, नाशिकमध्ये पर्यटनासाठी नागरिकांनी केलेली गर्दी या साऱ्याचा एकत्रित परिणाम पाहता अखेर झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. तीन महिन्यांपू्र्वी बंद केलेले 16 कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू झाले आहेत.
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा
ऑनलाईन पद्धतीने होणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 15 फेब्रुवारीपासून परीक्षांना सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यापीठ प्रशासन आता ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी कोणती यंत्रणा वापरणार याकडे देखील लक्ष लागलंय. विद्यार्थ्यांनी 20 जानेवारीपर्यंत अर्ज सादर केल्यानंतर विद्यापीठाकडून परीक्षेसंदर्भातील पुढील प्रक्रिया सुरु होणार आहे.
सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक
पंडित बिरजू महाराज यांचे निधन
सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ‘पद्मविभूषण’ने सन्मानित बिरजू महाराज यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील साकेत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. पंडित बिरजू महाराजांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
MPSC वेबसाईट डाऊन, ऑनलाईन
अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) ऑनलाईन प्रणाली असणारी वेबसाईट डाऊन झाल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलं होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यानंतर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदतवाढ देखील दिली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केलेल्या सर्व जाहिरातींची सुरु असणारी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
कर्णधारपद हा कुणाचा जन्मसिद्ध
हक्क नाही : गौतम गंभीर
स्टार स्पोर्ट्स शो गेम प्लॅनवरील चर्चेदरम्यान, गौतम गंभीरला विचारण्यात आले की आपण नवीन कोहलीला पाहणार आहोत का? त्याने उत्तर दिले की, ”तुम्हाला नवीन काय पाहायचे आहे? कर्णधारपद हा कुणाचा जन्मसिद्ध हक्क नाही. धोनीसारख्या खेळाडूने विराट कोहलीला कर्णधारपद दिले, तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे, त्याने तीन आयसीसी ट्रॉफी आणि चार आयपीएल ट्रॉफीही जिंकल्या आहेत.”
SD social media
9850 60 35 90