मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या भागात सकाळपासून धुवाँधार पाऊस बरसत आहे. ढगाळ वातावरण आणि बरसणाऱ्या पावसाने परिसरात काळोख दाटला आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर आता तो जोर पकडणार असल्याचं चिन्हं आहे.
मुंबईसह कोकणकिनारपट्टीवर ढगांनी गर्दी केली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर मुंबईच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात 300 मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत आज सकाळी 10 वाजताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, मलाड आणि दहिसरमध्ये काळेकुट्ट ढग दाटून आले, आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. कांदिवली, मलाडमध्ये पावसामुळे रस्त्यावरची दृश्यता कमी झाली, आणि त्यामुळे रस्त्यावर गाड्या धीम्या गतीने जाताना पाहायला मिळाल्या. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरची परिस्थितीही अशीच काहीशी होती.
मुंबईत बुधवार ते शनिवार म्हणजेच 10 जून ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या 4 दिवसांत तुफान पाऊस होऊ शकतो, त्यामुळे सतर्क राहण्याचं हवामान विभागाने राज्य सरकारला सांगितलं आहे. हेच नाहीतर राज्य सरकारनेही जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय मुंबईतील पडण्याजोग्या इमारती, बांधकामं यापासून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे तसेच कोरोना रुग्णालयांमध्ये विशेष काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.