प्रकाश आंबेडकरांवर बायपास सर्जरी, तीन महिने विश्रांती

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली आहे. त्यामुळेच ते तीन महिने विश्रांती घेणार असून या दरम्यान कोणत्याही राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी झाल्याची माहिती दिली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरून रोज देण्यात येईल, असं रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, आंबेडकरांना कोणत्या रुग्णालयात आणि कुठे दाखल करण्यात आलं आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

काल प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ ट्विट करून तीन महिने कार्यरत राहणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मी स्वत: तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नाही. या काळात कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही. माझ्या व्यक्तिगत कारणासाठी मी तीन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष चालला पाहिजे. संघटन चाललं पाहिजे. पाच जिल्ह्यात निवडणुका आहेत. त्यासाठी पक्षाला अध्यक्ष हवा. त्यामुळे रेखाताई ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही सर्व रेखाताई ठाकूर यांना सहकार्य कराल आणि पाच जिल्ह्यातील निवडणुकात विजयाच्या दिशेने वाटचाल कराल अशी आशा आहे, असं आंबेडकर यांनी ट्विटमधून म्हटलं होतं. त्यामुळे वेगवेगळे राजकीय कयास वर्तवले जात होते. मात्र, आज त्यांच्या बायपास सर्जरीची बातमी पुढे आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.