केंद्र सरकारमध्ये फेरबदल झाला आहे. नव्या विस्तारात महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ताबदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. जोपर्यंत आज्ञा असेल तोपर्यंत आम्ही विरोधात बसणार आहोत, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना केंद्रात विस्तार झाला आहे. आता किती दिवस विरोधात बसणार?, असा सवाल फडणवीसांना विचारण्यात आला. अचानक आलेल्या या प्रश्नावर फडणवीस किंचित थांबले. त्यानंतर त्यांनी सूचक विधान केलं. जितका काळ विरोधात बसायचं… म्हणजे आम्हाला आज्ञा असेल तोपर्यंत विरोधात बसणार, असं फडणवीस यांनी सांगितलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सहकार खात्यावरून भाजपवर टीका केली होती. त्यावर फडणवीसांनी राऊतांना फटकारले. राऊतांना सर्व गोष्टी माहीत आहेत, असं तुम्हाला का वाटतं? तेच पंडित आहेत, त्यांनाच सर्व काही समजतं. त्यांनाच संविधान समजतं हा तुमचा गैरसमज आहे. इतके वर्ष एनसीडीसीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये केंद्राने राज्याला दिले. ते कशाच्या अखत्यारीत दिले होते? केंद्र सरकारने दूध संघापासून ते सूत गिरण्यांपर्यंत मदत केली, असं सांगतानाच राऊत, सर्वज्ञ आहेत असं तुम्हाला वाटत असेल, पण ते खरं नाहीये, असा चिमटा त्यांनी काढला.
इंधन दरवाढीवरून सत्ताधारी आघाडीने केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या सरकारमधील एखाद्या मंत्र्याला त्याच्या बायकोने मारलं तरी हे म्हणतील त्यात केंद्राचा हात आहे, असा टोला त्यांनी लगावला.
विधानसभेत झालेल्या गोंधळावरही फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. मी गेले २२ वर्ष सभागृहात आहे. कुणाला आवडो न आवडो पण माझंही एक महाराष्ट्रात रेप्युटेशन आहे. त्याआधारे सांगतो, भाजपच्या एकाही नेत्याने सभागृहात शिवीगाळ केलेली नाही. एकाही नाही. कोणीही नाही. बाचाबाची झाली. तीही डिस्टन्सवरून झाली. सेनेचे लोकं आमच्या अंगावर आले. शिवीगाळ करणारे कोण होते याची नीट माहिती घ्या. या लोकांची नावं मी योग्यवेळी सांगेल. पण एवढं सांगतो पीठासीन अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली नाही. हे सर्व कपोलकल्पित आहे.