ईएसबीसी प्रवर्गातून दिलेल्या नियुक्त्या
कायम करण्याचा शासनाचा निर्णय
ईएसबीसी प्रवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या किंवा पदांच्या आरक्षणाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालनाने 14 नोव्हेंबर 2014 रोजी अंतरिम स्थगिती दिली होती. मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय शासनाने नुकताच जाहीर केला आहे. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने जारी केला आहे.
खडसेंच्या संदर्भातील गोपनीय समितीने
दिलेला अहवाल मंत्रालयातून गायब
भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. खडसे यांच्या जावयाला ईडीकडून करण्यात आलेली असून, सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीची चर्चा सुरू असतानाच राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने न्या. झोटिंग समिती नियुक्त केली होती. या समितीने गोपनीय अहवालही सरकारकडे सुपूर्द केला होता. हा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी अहवालाची मागणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
करोना म्हणजे सरकारने
उठवलेले थोतांड : संभाजी भिडे
करोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अंशतः निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवरून शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सरकारवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. “करोना म्हणजे सरकारने उठवलेले थोतांड आहे. करोनामुळे सध्या मंदिरं बंद असून, देवांना कुलूपबंद करून ठेवण्यात आले आहे. वारी झाली असती, तर करोना दिसला नसता”, असं भिडे यांनी म्हटलं असून, त्यांच्या विधानाची चर्चा होत आहे.
वेळ आली तर कठोर
निर्णयही घेऊ : पंकजा मुंडे
आधी विधान परिषद… नंतर राज्यसभा आणि आता मंत्रिमंडळात मुंडे भगिनींना डावलण्यात आल्यानं मुंडे समर्थकांची नाराजी बाहेर पडली. त्यावरून राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगल्या. मुंडे भगिनींना डावलण्यासाठी कराडांना मंत्रिमंडळात घेण्यात आल्याचंही बोललं गेलं. या सगळ्या चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनाम्याचं अस्त्र उगारलं. राजीनामे दिलेल्या कार्यकर्त्यांशी पंकजा मुंडे यांनी दिल्लीतून मुंबईत परतताच आज संवाद साधला. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी कुणाचाही नामोल्लेख केला नाही. मात्र राज्यातील भाजपा नेतृत्वावरील त्यांची नाराजीही लपून राहिली नाही. यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी वेळ आली तर कठोर निर्णयही घेऊ असा अप्रत्यक्ष इशाराही दिला.
दहावीचा निकाल १५ जुलै
पर्यंत जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एमएसबीएसएचएसई) महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. यापूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की महाराष्ट्रातील दहावीचा निकाल १५ जुलै पर्यंत जाहीर केला जाईल. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे राज्य मंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार या आठवड्यामध्ये दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
मध्य प्रदेशात करोनामुळे एका
दिवसात १४७८ जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशात करोनामुळे मृतांच्या आकडेवारीत एका दिवसात विक्रमी नोंद झाली आहे. एका दिवसात १ हजार ४७८ जणांची यात नोंद करण्यात आल्याने एकूण मृतांचा आकडा १० हजारांच्या पार गेला आहे. तर देशातील मृत्यू दर हा १.३३ टक्के इतका झाला आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात मृतांचा आकडा १०० च्या खाली होता. त्यात सोमवारी अचानक १,४७८ जणांची भर पडल्याने चिंतेत भर पडली आहे. मध्य प्रदेशात मृतांचा एकूण आकडा हा १०,५०६ इतका झाला आहे. त्यानंतर या आकडेवारीबाबत सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे.
सहा महिन्यांत ८६
वाघांच्या मृत्यूची नोंद
भारतात सलग दोन वर्षांपासून वाघांच्या मृत्यूची वाढती आकडेवारी चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या सहा महिन्यांत ८६ वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्र मांकावर आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत देशात वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात १५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील दोन व्याघ्रगणनांमध्ये वाघांची संख्या वाढलेली दिसत असतानाच मृत्यूच्या वाढणाऱ्या आकडेवारीने वन खात्यासमोर व्याघ्रसंरक्षणाचे आव्हान निर्माण केले आहे.
सौरव गांगुलीच्या
बायोपिक वर चित्रपट
भारतीय क्रिकेट इतिहासातील एक यशस्वी कर्णधार, उत्कृष्ट दर्जाचा डावखुरा फलंदाज, आपल्या जोशपूर्ण खेळीने प्रतिस्पर्ध्यांना गारद करुन सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा खेळाडू म्हणजे सौरव गांगुली. भारतात सौरवचे करोडो चाहते असून सर्वंचजण त्याच्या जीवनाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण याबाबतची कोणतीच नेमकी माहिती आतापर्यंत समोर आली नव्हती. पण आज अखेर सौरवने बोलताना आपण आपल्या क्रिकेट जीवनावर बायोपिक करण्यास होकार दिला असल्याची माहिती दिली.
माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे
हृदयविकाराच्या झटक्याने निधन
माजी क्रिकेटपटू आणि १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ६६व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. माजी कर्णधार कपिल देव यशपाल शर्मा यांच्या मृत्यूनंतर अश्रू रोखू शकले नाहीत. टीव्ही चॅनेलवर बोलताना ते रडू लागले. यशपाल यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यपदाची जबाबदारीही पार पाडली होती.
सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही
लसीचं उत्पादन सुरू करणार
भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यासोबतच स्पुटनिक व्ही आणि मॉडर्ना या लसींना देखील मंजुरी देण्यात आली असून लवकरच त्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातच रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे करोनाविरोधातील लढ्यामध्ये भारताकडे अजून एका लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू होऊ शकणार आहे.
नाना पटोले म्हणजे रोज मरे,
त्याला कोण रडे : प्रविण दरेकर
नाना पटोलेंची वादग्रस्त वक्तव्य आल्यानंतर शिवसेनेचे अरविंद सावंत, उपमुख्यमंत्री अजित पवार, नवाब मलिक यांनी त्यांच्या विधानांचा समाचार घेतला. त्यासंदर्भात बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, “नाना पटोलेंनी एकदाच नाही, तर अनेक वेळा तलवार म्यान केली आहे. रोज मरे, त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झाली आहे. ते येतात जोरात. कदाचित त्यांच्या भावना खऱ्या असतील. त्यामुळे त्यांनी त्या ताकदीने मांडल्या. पण नंतर अजित पवारांची नाराजी आणि मुख्यमंत्र्यांनी दट्ट्या दिला असणार”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
SD social media
9850 60 3590