विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात सुरू झालेलं वादळ अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा गट सध्या जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीस स्टेशनला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांना विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतील अशी सूचना पोलिसांना मिळाल्याचं वृत्त ANI नं दिलं आहे. राज्यातील शांततेला कोणताही धक्का लागू नये यासाठी पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय.
शिवसैनिक आक्रमक
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक झाला आहे. राज्यातील अनेक भागात शिवसैनिकांनी शुक्रवारी आंदोलन केलं. मुंबईतील शिवसैनिक विशेष आक्रमक होते. शिवसैनिकांनी मंगेश कुडाळकर यांच्या कुर्ला येथील नेहरु नगर येथील कार्यालयावर हल्ला केला. यावेळी शिवसैनिकांच्या हातात लोखंडी रॉड होते. शिवसैनिक त्या रॉडने मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या नामफलकावर हल्ला करत होते. यावेळी त्यांनी कुडाळकर यांच्या नावाचं बॅनर फाडलं. तसेच त्यांचा बॅनवरील फोटो देखील फाडला. शिवसैनिकांनी आमदार दिलीप लांडे यांचाही बॅनर फाडला. नाशिकमध्येही एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांना इशारा
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक झाली. वर्तमान आमदार पक्ष तोडण्याचा प्रयत्न ककत आहेत. मी सध्या वर्षा बंगला सोडलाय. पक्षासाठी लढण्याची हिंमत सोडली नाही. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आला तर, तो जिंकू’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. बंडखोर आमदारांनी चुकीचं पाऊल उचललंय असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
‘माझं मुख्यमंत्रिपद नाकारणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडं न्या, फांद्या न्या, पण मूळ तुम्ही नेऊ शकत नाही. हे सारं भाजपने केलं आहे, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल. तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केलं?’, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.