भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या अध्यपदाची धुरा आता माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. 1983च्या वन-डे वर्ल्ड कपविजेत्या भारतीय संघामध्ये बिन्नी होते. आता माजी कर्णधार सौरव गांगुली याच्यानंतर नियामक मंडळाचे ते अध्यक्ष झाले आहेत. रॉजर बिन्नींचं संघात काय स्थान होतं, त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता, हे जाणून घेऊया.
रॉजर बिन्नी यांचं नाव 1983च्या वर्ल्ड कपशी जोडलं गेलं आहे. त्यांची हीच ओळख सगळ्यांना माहीत आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षही ते झाले आहेत. मात्र त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. रॉजर बिन्नी यांचं कुटुंब मूळचं स्कॉटलंडमधलं, मात्र गेल्या 4 पिढ्या भारतात राहिल्यामुळे स्कॉटलंडशी त्यांचे संबंध फारसे राहिले नाहीत. त्यांचे वडील रेल्वेमध्ये गार्ड म्हणून नोकरी करत होते. त्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत असत. याच कारणामुळे वडिलांनी रॉजर यांना सालेमच्या बोर्डिंग स्कूलमध्ये घातलं. ते बालपणापासूनच ऑलराउंडर होते. हॉकी, फुटबॉल, अॅथलेटिक्स अशा खेळांमध्ये ते भाग घेत होते. फुटबॉलमध्ये ते गोल कीपिंग करायचे, तर हॉकीमध्ये हाफ बॅक पोझिशनवर खेळायचे. यावरून त्यांच्या ऑलराउंडर व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. अॅथलेटिक्समध्येही ते लांब उडी, उंच उडी, शॉटपुट आणि जॅव्हलीन थ्रो म्हणजे भालाफेक खेळायचे. 1973मध्ये त्यांनी 18 वर्षांखालील जॅव्हलीन थ्रो स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवला. क्रिकेटचं वेड त्यांना त्यामानानं उशिरा लागलं.
1973मध्ये कर्नाटक स्कूलतर्फे त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. हा त्यांच्या क्रिकेट करिअरमधला पहिला टप्पा होता. ते दक्षिण विभागाकडून खेळू लागले. त्यानंतर लगेच 1975मध्ये त्यांची कर्नाटकच्या टीमसाठी निवड झाली. काही वर्षांनी पाकिस्तानविरुद्ध बेंगळुरमध्ये टेस्ट मॅचमधून त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरला सुरुवात झाली आणि भारतीय टीममधून खेळणारे रॉजर बिन्नी हे पहिले अँग्लो-इंडियन खेळाडू ठरले. 1983 मधील वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सर्वांत जास्त विकेट घेणारे ते खेळाडू ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी 29 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. या त्यांच्या खेळामुळेच भारतीय टीम उपांत्य फेरी गाठू शकला.
बिन्नी यांचं नाव वर्ल्ड कपशी जणू जोडलंच गेलेलं आहे. 1983मध्ये मैदानावर खेळून त्यांनी वन-डे वर्ल्ड कप जिंकून दिला होता. 2000 साली रॉजर बिन्नी भारताच्या 19 वर्षांखालील टीमचे कोच असताना भारताने 19 वर्षांखालील वन-डे वर्ल्ड कप जिंकला होता. मोहम्मद कैफ या टीमचा कॅप्टन होता. कोच म्हणून काम केल्यावर त्यांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रशासकीय काम करण्याचा निर्णय घेतला.
रॉजर बिन्नी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. 2012मध्ये त्यांना राष्ट्रीय निवड समितीत घेतलं गेलं. त्यानंतर 2015 च्या विश्वचषकासाठी त्यांनी टीम इंडियाची निवड केली. त्यात त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीही होता. यावरून त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोपही करण्यात आला, मात्र मुलाच्या निवडीमागे आपला सहभाग नसल्याचं त्यांनी वेळोवेळी सांगितलं.एका गरीब कुटुंबातून वर येऊन क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदापर्यंतचा रॉजर बिन्नी यांचा प्रवास खूपच रंजक आहे.