मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने भाजपलाच धक्का दिला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेने भाजपचा महामंत्री राम यादव यांना स्वत:च्या पक्षात घेतलं आहे. राम यादव यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रेखा यादव यांनीही बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राम यादव हे भाजपच्या उत्तर भारतीय सेलचे महामंत्री होते.
आमदार प्रकाश सुर्वे यांनी राम यादव यांना पक्षात घेऊन भाजपला धक्का दिला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये राम यादव आणि रेखा यादव यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश झाला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक 12 मध्ये शिंदे गटाच्या शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या शिवसेना शाखेचे उद्घाटन झालं.यावेळी आमदार प्रकाश सुर्वे आणि शिंदे गटाचे अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते वॉर्ड 4 मध्ये देखील शाखेचे उद्घाटन केले होते, यामुळे आता मुंबई उपनगरात शिंदे गटाच्या दोन शाखा उभ्या राहिल्या आहेत.