25 जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच देशातील पर्यटनस्थळांचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार प्रसार केला जाणार आहे. देशातील पर्यटनस्थळांची (Tourism) संपूर्ण जगाला ओळख व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने देशाची विविधता, एकता, आपली संस्कृती (Indian Culture) जगभरात पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. राष्ट्रीय पर्यटन दिवस का साजरा केला जातो ? त्याचा इतिहास काय आहे ? याबद्दल जाणून घेऊया..
1948 पासून साजरा केला जातो राष्ट्रीय पर्यटन दिवस
आपल्या देशाचे वैभव जगासमोर आणण्याचा राष्ट्रीय पर्यटन दिवस हा एक प्रभावी मार्ग आहे. तसं पाहायचं झालं तर विश्व पर्यटन दिवस 27 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. मात्र भारताचा राष्ट्रीय पर्यटन दिवस हा 25 जानेवारी रोजी आहे. या दिवसाची सुरुवात 1948 रोजी म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगेच झाली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 1951 साली कोलकाता, चैन्नई येथे विभागीय पर्यटन कार्यालयांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दिल्ली, मुंबई येथेदेखील पर्यटन कार्यालय तयार करण्यात आले.
देशातील पर्यटन स्थळांचे महत्त्व अधोरेखित व्हावे हा राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच हा दिवस साजरा करुन पर्यटनाला चालना मिळेल तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला पर्यटनाच्या माध्यमातून बळ मिळावे, यामुळे देखील हा दिवस साजरा केला जातो. वैश्विक स्तरावर पर्यटानाचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, तसेच सांस्कृतिक मुल्याच्या महत्त्वाबाबात जागरुकता वाढवण्यासाठीही हा दिवस देसभरात साजरा केला जातो.
भारत देशात जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या ठिकाणांना भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक हजेरी लावतात. ताजमहाल तसेच वेरुळ अजिंठा यासारख्या कलाकृती पाहण्यासाठी लोक सात समुद्र पार करुन येतात. आपल्या देशात पर्यटनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल होते. पर्यटनामुळे देशाच्या तिजोरीत दरवर्षी हजारो कोटी रुपये येतात. पर्यटनामुळे देशाची संस्कृती तसेच महानता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते. देशातील जवळपास 7.7 टक्के लोकांना पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून रोजगार मिळतो. त्यामुळे आपल्या देशात पर्यटनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.