वर्ध्यातील भीषण कार अपघातामध्ये आमदाराच्या मुलासह सात विद्यार्थी ठार

वर्ध्यातील भीषण कार अपघातामध्ये भंडारा जिल्ह्यातील तिरोड्याचे आमदार विजय रहांगदळे यांच्या मुलावरही काळानं घाला घातला आहे. विजय रहांगदळे यांचे सुपुत्र यांचा वर्ध्यातील भीषण कार अपघातात मृत्यू झाला असल्याचं वृत्त हाती येतंय. यामुळे रहांगदळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एकूण सात विद्यार्थ्यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. भाजप आमदार विजय रहांगदळे हे भंडारा जिल्ह्याचे आमदार आहेत. त्यांच्या मुलासह एकूण सात विद्यार्थी या भीषण अपघातात दगावले असून इतर सहा जणांची अद्याप ओळख पटलेली नाही.

इतर मृत विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. भीषण कार अपघातातानं सातही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाडा डोंगर कोसळला आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात भीषण अपघातांची मालिका सुरु असून आतापर्यंत झालेल्या तीन अपघातात 15 जणांचा गेल्या 48 तासांत जीव गेला. तब्बल चार तास मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. कारमधील एकाचाही या अपघातात जीव वाचू शकलेला नाही.

चारचाकी एक्सयुव्ही वाहनावरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचं बोललं जातंय. कार नेमकी कोण चालवत होतं, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा संपल्यामुळे पार्टी करण्यासाठी हे सर्व विद्यार्थी गेले असल्याचं बोललं जातंय. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. कार थेट पुलावरुन खाली कोसळल्यानं या अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ मेडिकल विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला आहे. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार थेट खाली कोसळली. तब्बल 40 फूट उंचीवरुन विद्यार्थ्यांची कार खाली पडल्याने सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील सर्व मृत विद्यार्थ्यांचं वय 25 ते 35 च्या दरम्यान असल्याचं कळतंय. मध्यरात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, अपघातानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.