कोरोनाची तिसरी लाट आणि ब्लॅक फंगसचं थैमान यामुळे महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. आता त्यामध्ये शिथीलता आणण्याच्या हालचाली सुरु असल्या तर काही जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये आहेत. या रेड झोन जिल्ह्यांमध्ये सरसकट शिथीलता आणता येणार नाही, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन वडेट्टीवारांनी विविध विषयावर भाष्य केलं.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रात आता कोरोना रुग्ण कमी होत आहेत. लॉक डाऊन शिथील करण्याची मागणी होत आहे. पुढच्या पाच सहा दिवसात परिस्थिती बघून निर्णय होईल. माहितीप्रमाणे 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे सरसकट शिथील करता येणार नाही. काही झोन करता येतील. कंटेन्मेंट झोन करून तिथे नियम कडक करावे लागतील. जिथं रुग्ण संख्या कमी तिथे शिथील करावे लागेल”. जे जिल्हे रेड झोन मध्ये आहेत तिथे कडक लॉकडाऊन असला पाहिजे. गृह विलगिकरणाला अर्थ नाही लोकांना संस्थात्मक विलगीकरण केलं पाहिजे. कुटुंबाच्या कुटुंब कोरोना बाधित होत आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
रेड झोनमधील जिल्हे
बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला,सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद हे 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे 31 मे नंतर जरी राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाली, तरी या जिल्ह्यांमध्ये शिथीलता येण्याची शक्यता कमी आहे.