हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार?

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरत विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस मंत्र्यांच्या कामकाजाची यादी मागवली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधिवेशनानंतर पुढच्या काही दिवसांत मंत्र्यांच्या कामांची यादी घेऊन दिल्लीला जाणार आहेत. तिथे काँग्रेसच्या हायकमांडसोबत चर्चा करुन मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. ज्या मंत्र्यांनी समाधानकारक काम केलंय त्यांनाच मंत्रिपदी ठेवलं जाणार आहे. काँग्रेसच्या जवळपास दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सर्व मंत्र्यांच्या कामांची माहिती राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी कोणत्या मंत्र्याला ठेवायचं आणि कुणाला डच्चू द्यायचा याबाबतचा निर्णय घेणार आहेत. विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार त्या मंत्र्यांच्या कामकाजांवर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं देखील वृत्त आहे.

राहुल गांधी यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष लक्ष

काँग्रेससाठी खरंतर सध्या विधानसभा अध्यक्ष कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यांच्या जानेवारी महिन्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या चार ठिकाणी रॅली होणार आहेत. काँग्रेसची एकेकाळी महाराष्ट्रात सत्ता होती. तळागळापर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचलेला होता. आता पुन्हा काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी राहुल गांधी कामाला लागले आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन रस्सीखेच

महाराष्ट्रात सध्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी 28 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असल्याचं निश्चित झालं आहे. विशेष म्हणजे हे मतदान आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. खरंतर आवाजी मतदानावर भाजपचा आक्षेप होता. यासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीकडे 47 शिफारसी गेल्या होत्या. पण समितीने त्या सगळ्या शिफारसी फेटाळत आवाजी मतदानाने निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. आता अध्यक्षपदासाठी खूप रस्सीखेच सुरु आहे. अध्यक्षपदासाठी 27 डिसेंबरला अर्ज दाखल करण्यात येतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतदान पार पडील. दरम्यान, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.