आज दि.२० जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

राज्यातील शाळा सोमवारपासून
सुरू करण्याचा निर्णय

राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते बारावी असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसंच निर्णयाचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असतील असंही स्पष्ट केलं आहे. पालकांची समंती आवश्यक असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान बोलताना अडखळले
अर्थाचा झाला अनर्थ

ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आज पंतप्रधान मोदींनी नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. नागरिकांना संबोधित करताना त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाव,’ म्हटल्यानं त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्तरावर संबोधित करताना घोषणेचा चुकीच्या पद्धतीने उच्चार केल्याने त्यातून चुकीचा संदेश जातो, अशी टीका होत आहे.

लष्करप्रमुख नरवणे, अमित शाह यांना
अटक करा, पाकिस्तानची मागणी

सध्या पाकिस्तानचा भारतीय लष्कराबाबत पाकिस्तानचा खोटा प्रचार सुरू आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ब्रिटन पोलिसांना जम्मू-काश्मीरमधील गुन्ह्यांसाठी भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अटक करण्याची विनंती करण्यात आली आहे. स्टोक व्हाईट या ब्रिटनस्थित कायदे कंपनीने कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरीकांच्या विरोधातील गुन्ह्यांमधील कथित भूमिकेबद्दल भारतीय लष्करप्रमुख, गृहमंत्री यांच्यासह आणखी आठ उच्च लष्करी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या युद्ध गुन्हे युनिटला तथाकथित पुरावे सादर केले आहेत.

कालीचरण महाराज यांची
ठाणे पोलिसांत चौकशी

महात्मा गांधीजींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तथाकथित साधू कालीचरण महाराज याची चौकशी आता ठाणे पोलीस करणार आहेत. रायपूर आणि वर्धा पोलिसांनंतर आता नौपाडा पोलिसांनी कालीचरणचा ताबा घेतला आहे. गांधींजींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरणच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून कालीचरणवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याची चौकशी होणार आहे. या अगोदर रायपूर आणि वर्धा पोलिसांनी कालीचरणची चौकशी केली होती.

वडील संपात सहभागी होण्यासाठी
गेल्यानंतर तरुणाची घरात आत्महत्या

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी होण्यासाठी आपण जात असल्याचं सांगत वडिलांनी घर सोडल्याच्या रागातून एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार सोलापूरमध्ये घडलाय. संपात सहभागी होण्याचं सांगत वडिलांनी घर सोडले अन् २० वर्षीय मुलानं आईची साडी गळ्याला गुंडाळून आपली जीवनयात्रा संपविली. वडिलांनी घर सोडून एसटी संपात जात असल्याचं सांगितल्यानंतर त्याने वडिलांकडे खर्चासाठी पैसे मागितले होते. त्यातून त्यांच्यात वाद झाला होता. याच वादातून अमर माळीने गळफास लावून आत्महत्या केली. कोंडी येथे हा दुर्दैवी प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास घडला.

९८३ कोटी रुपयात रिलायन्सने
घेतली अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजी कंपनी

आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असणाऱ्या मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने भारतामधील एक स्टार्टअप कंपनी विकत घेतलीय. अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजी असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीमधील ५४ टक्के शेअर्स रिलायन्सने विकत घेतले आहेत. यासाठी कंपनीने १३२ मिलीयन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ९८३ कोटी रुपये मोजले आहेत. नोएडामध्ये मुख्यालय असणारी अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजीज ही एक स्टार्टअप कंपनी असून ते रोबोटिक्स क्षेत्रात काम करतात.

शेअर बाजारात दुसऱ्या
दिवशीही घसरण

बाजार सुरू होताच मोठ्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने दोन्ही निर्देशांकात घसरण दिसून आली. बाजारात आयटी इंडेक्समध्ये आज मोठी घसरण नोंदवली गेली. त्यासोबत फार्मा, ऑटो आणि फायनान्शिएल इंडेक्सदेखील दबावात व्यवहार करीत आहेत. दुपारी 2 वाजेपर्यंत सेंसेक्स तब्बल 800 अंकांहून अधिक तर निफ्टी 220 अंकानी घसरले होते. काल रोजी देखील सेसेंक्स 500 हून अधिक अंकांनी घसरला होता. सध्या सेसेंक्स 59,236.67 अंकाच्या आसपास व्यवहार करीत आहेत तर निफ्टी 17,716.80 अंकावर व्यवहार करीत आहे.

राज्यात दोन दिवसात पुन्हा
अवकाळी पावसाचे संकट

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट येणार आहे. आधीच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतकरी अडचणीत आला आहे. आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी धास्तावला आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात अवकाळी पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 22 जानेवारी आणि 23 जानेवारी या दोन दिवसात पाऊस पडेल. उद्या आणि परवा गारपीटची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम आहे.

भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या
वेबसाइट्स यु ट्यूब चॅनल्सवर बंदी

अफवा पसरवणाऱ्या आणि भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने खोटी माहिती पसरवणे आणि भारताविरोधी षडयंत्र केल्याचा ठपका ठेवत २० यु ट्यूब चॅनल्स आणि २ वेबसाइट्सवर बंदी घातली होती. आता या निर्णयानंतर केंद्र सरकार अशा वेबसाइट्स आणि युट्यूबवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा अनुराग ठाकूर यांनी दिलाय.

राज्यात 43 हजार 697 नवे
कोरोना रुग्ण आढळले

महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या पुन्हा 40 हजारांच्या वर गेली आहे. बुधवारी राज्यात 43 हजार 697 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 49 रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 46 हजार 591 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले.

मेडिकल स्टोअर्समध्येही
कोव्हीशील्ड , कोवॅक्सिन मिळणार

कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात भारताला आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लवकरच रुग्णालयांबरोबरच मेडिकल स्टोअर्समध्येही कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसी मिळणार आहेत. या लसींची खुल्या बाजारात विक्री करण्यास परवानगी देण्याची शिफारस केंद्र सरकारच्या विशेष समितीने केली आहे. तज्ज्ञांच्या विशेष समितीची महत्वाची बैठक झाली. त्या बैठकीत समितीने कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिन या लसी विकण्यास आपली मंजुरी दिली आहे.

बिहार मध्ये नदीत बोट उलटली,
चोवीस शेतकरी बुडाल्याची भीती

शेतकऱ्यांनी घेऊन जाणारी बोट गंडक नदीत बुडाल्याने 24 शेतकरी बुडाल्याची दुर्दैवी घटना बिहारमधील गोपालगंज येथे घडली आहे. बुडालेल्यांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर बोटीमधील एका इसमाने दुर्घटनेनंतर नदीतून पोहत आपले प्राण वाचवले आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. बुडालेल्यांमध्ये दोन मुलींचाही समावेश आहे.

उल्हासनगर मध्ये जुगार
खेळणाऱ्या महिलांना अटक

राज्यात ड्रग्ज, जुगार अशा अवैध गोष्टींना प्रतिबंध आहे. काही लोकांना जुगार खेळणं तर प्रतिष्ठेचं वाटतं. जुगार म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर पैसे लावून पत्ते खेळणारे पुरुष येतात. पण उल्हासनगरात पोलिसांनी चक्क एका महिलांच्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केलाय. जुगारी महिलांवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा लाईव्ह व्हिडीओदेखील समोर आलाय. विशेष म्हणजे या महिला मनोरंजन म्हणून नव्हे तर हजारो रुपयांचा जुगाराचा खेळ खेळत होत्या. या महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.