बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आल्या ज्यांनी काही चित्रपट करून खूप प्रसिद्धी मिळवली, मात्र काहीच दिवसांत त्या गायब झाल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे मिनिषा लांबा. मिनिषाने लाईम लाईटचा अनुभव घेतला मात्र ती नंतर गायब झाली. मग नंतर, ती एकतर एखाद्या म्युझिक व्हिडीओमध्ये किंवा एखाद्या जाहिरातीमध्ये दिसली होती. मिनिषा लांबाचे आयुष्य असेच सुरु आहे. या क्षणी, मिनिषा लांबा तिच्या एका चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आशु यांनी केले आहे.
या चित्रपटामध्ये ए-लिस्टर कलाकार नसल्यामुळे या चित्रपटाची बातमी सध्या तरी कुठे आलेली नाही. टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा आणि अभिनेते संजय मिश्रा या चित्रपटात मिनीषा लांबासोबत दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर, मिनिषाने काही काळ विश्रांती घेतली आणि आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी बाहेर गेली.
मिनीषा लांबा सध्या आपल्या कुटुंबासमवेत दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनी भागात राहत आहे. मिनिषाला चर्चेत राहणे आवडत नाही, म्हणूनच तिने इंडस्ट्रीपासून मर्यादित अंतर बाळगले आहे. अहवालानुसार, मिनिषा म्हणाली की, ‘मी बर्याच दिवसांपासून मुलाखत दिली नाही, परंतु हे प्रथमच घडत नाहीय. चित्रपटांपासून दूर असूनही, मी परत येण्यास उत्सुक आहे. मला चांगल्या ऑफर मला मिळत नव्हत्या, म्हणून मला आणखी प्रतीक्षा करावी लागली. तो काळ माझ्यासाठी कठीण होता.’
मिनिषा लांबाला पत्रकार व्हायचं होतं. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत मिनिषा म्हणाली होती की, मला पत्रकार व्हायचे होते. या क्षेत्रासाठी मी स्वत:ला चांगल्याप्रकारे तयार केले होते. मी माझे इंग्रजी ऑनर्स पूर्ण केले. परंतु, माझ्या नशीबात काही वेगळेच होते. माझ्या नशिबाने माझ्यासाठी काही वेगळ्या योजना तयार केल्या होत्या. जेव्हा मी पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये होते, तेव्हा मला विविध जाहिरातींच्या ऑफर मिळू लागल्या. अशाच एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान, शूजित सरकार त्यांच्या ‘यँहा’ चित्रपटासाठी माझ्याकडे आले. या चित्रपटानंतर मी मागे वळून पाहिले नाही.
मिनिषा लांबाची कारकीर्द तिला हवी तशी नव्हती. ‘यँहा’ चित्रपटानंतर मिनिषा लांबाने ‘कॉर्पोरेट’, ‘रॉकी द रिबेल’, ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘दस कहानियां’, ‘बचना ए हसीनो’, ‘किडनॅप’, ‘जिला गाझियाबाद’, ‘भूमी’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मोठ्या पडद्याशिवाय मिनिषा लांबा छोट्या पडद्यावरदेखील दिसली. ‘तेनाली रामा’, ‘बिग बॉस सीझन 8’, ‘छुना है आसमान’, ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ आणि ‘इंटरनेट वाला प्रेम’ या कार्यक्रमांमध्ये दिसली आहे.