मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका मालेगावला बसला आहे. मालेगावतील एकता हॉटेलच्या दुमजली इमारतीचा पुढचा भाग यामुळे कोसळला आहे. ही हॉटेल मुंबई-आग्रा महामार्गाला खेटून चाळीसगाव फाट्याजवळ आहे. या घटनेत हॉटेल जवळपास उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे. ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दोन जखमी झाले आहेत.
मालेगावात आज दुपारी मुसळधार पाऊस आणि वादळी वारा सुरु होता. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एकता हॉटेलचा पुढचा भाग कोसळला. यावेळी हॉटेलबाहेर असलेल्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाऊस आणि वारा सुरु होता. अशा परिस्थितीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढणं हे मोठं आव्हान होतं. पण तेथील नागरिक हतबल होते. कारण एवढ्या मोठ्या ढिगातून लोकांना सुखरुप बाहेर काढणं शक्य नव्हतं. तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली.
काही वेळाने घटनास्थळावर अग्निशमन दलाची टीम दाखल झाली. त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली. पण त्याआधीच शहरातील काही लोकांनी एकत्र येऊन बचाव कार्याला सुरुवात केली होती. दरम्यान बचाव कार्यासाठी घटनास्थळी जेसीबी दाखल झालं. ढिगाऱ्यातून लोकांचा जीव वाचवण्यासाठी मदत कार्य सुरु झालं. यावेळी अग्निशमन जवानांच्या हाथी एक मृतदेह हाती लागला. या घटनेची माहिती संपूर्ण मालेगाव शहरात पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली.