एकनाथ शिंदेंचा 200 मतांचा दावा फोल! राष्ट्रपती निवडणुकीत राज्यातून मुर्मूंना किती मतं?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. मुर्मू यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 पेक्षा जास्त मतं पडतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता, पण त्यांचा हा दावा फोल ठरलेला दिसत आहे.

महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना 181 तर यशवंत सिन्हा यांना 98 मतं मिळाली. राज्याच्या 283 आमदारांनी मुर्मू यांना मत दिलं, यातली 279 मतं अधिकृत धरण्यात आली. रमेश लटके यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेची संख्या 287 एवढी आहे. यातले नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये असल्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करू शकले नाहीत. तर भाजपचे लक्ष्मण जगताप आजारपणामुळे मतदानाला येऊ शकले नाहीत. शिवसेनेचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी हे कोर्टात दोषी आढळल्यामुळे मतदानापासून वंचित राहिले.

विश्वासदर्शक ठरावावेळी किती मतं?

विश्वासदर्शक ठरावावेळी 263 जणांनी मतदान केलं होतं, यातली एकनाथ शिंदे यांना 164 मतं तर विरोधात 99 मतं गेली, तर 21 जणांनी मतदान केलं नाही. राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे त्यांचीही 15 मतं मुर्मू यांना पडली. शिंदेंना मिळालेली 164 आणि शिवसेनेची 15 मतं ही बेरीज केली तर एकूण संख्या 179 होते, म्हणजेच मुर्मू यांना विश्वासदर्शक ठरावापेक्षा 2 मतं जास्त पडली.

एकनाथ शिंदे जेव्हा विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले तेव्हा समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि रईस शेख तर एमआयएमचे फारुख अनवर यांनी मतदान केलं नाही. तर काँग्रेसचे 11 आमदार अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर, झिशान सिद्दीकी, राजू आवळे, मोहन हंबर्डे, कुणाल पाटील, माधवराव जवळगावकर आणि शिरिष चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. चव्हाण आणि वडेट्टीवार उशिरा सदनामध्ये आल्यामुळे त्यांना मतदानाला उपस्थित राहता आलं नाही.

विश्वासदर्शक ठरावावेळी राष्ट्रवादीचे आमदारही गैरहजर होते. अनिल देशमुख नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत, तर दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, बबनदादा शिंदे आणि संग्राम जगताप यांनी मतदान केलं नाही. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे दोन भाजपचे आमदार आजारी असल्यामुळे मतदानाला येऊ शकले नाहीत. तर एमआयएमचे मुफ्ती मोहम्मद इस्माईलही अधिवेशनासाठी उपस्थित नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.