राज ठाकरेंची फडणवीस-चंद्रकांत पाटलांशी चर्चा, राज्य सरकारचा इन्सटन्ट निर्णय!

भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. या वादाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. तसंच पिंपरी-चिंचवडमध्ये ना.चंद्रकांत पाटील  यांच्यावर शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी 307 हे कलम लावलं, तसंच पोलिसांचं निलंबनही करण्यात आलं.

या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आरोपींवरचं 307 हे कलम काढावं आणि पोलिसांचं निलंबन मागे घ्यावं, अशी मागणी राज ठाकरेंनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. आपल्या या विनंतीला त्यांनी तात्काळ होकार दिला, याबद्दल दोघांचे आभार, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

पिंपरी चिंचवड परिसरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि इतर काही नागरी संस्थांचे पदाधिकारी राज ठाकरे यांना भेटले. आरोपींवरचं 307 कलम काढावं आणि पोलिसांचं निलंबन मागे घ्यावं, यासाठी मध्यस्थी करा, अशी विनंती या शिष्टमंडळाने राज ठाकरेंकडे केली. त्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांशी चर्चा केली.

राज ठाकरेंची पोस्ट

लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली तर निषेध व्हायलाच हवा, आम्ही पण ‘मनसे स्टाईल’ने अनेकवेळा निषेध नोंदवतो. पण हे करताना काही संकेत असतात. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून विधानं करून माथी भडकवण्याचे उद्योग सुरु आहेत आणि त्या वादांमधून मतं मिळवण्याची केविलवाणी धडपड सुरु आहे. त्यामुळे एखादं विधान आलं की त्याचे संदर्भ न तपासता कार्यकर्त्यांना भडकवून, स्वतः नामानिराळं राहण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढायला लागलेत. मग ह्यांचे कार्यकर्ते पण कसलाच विचार न करता, कसलीही खातरजमा न करता, वाट्टेल त्या मार्गाने निषेध करत सुटतात.

असाच प्रकार, राज्यातील विद्यमान मंत्री, भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र श्री. चंद्रकांत पाटील ह्यांच्या बाबतीत घडला. एका कार्यक्रमात त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली. एक बरं झालं, की चंद्रकांत दादांच्या डोळ्याला कोणतीही इजा झाली नाही. हे झाल्यावर पोलीस आयुक्तांनी तिथे हजर असलेल्या ११ पोलिसांचं निलंबन केलं आणि आरोपींवर भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत अनेक कलमांच्या जोडीला, कलम ३०७ देखील लावलं. हे कलम सदोष मनुष्यवधाचं कलम आहे. हे सगळं जेंव्हा मला कळलं तेंव्हा मला सर्वप्रथम हळहळ वाटली ती माझ्या पोलीस बांधवांबद्दल. पोलिसांना हा प्रकार रोखता आला नाही हे मान्य, पण तरीही त्यांच्यावरची कारवाई मला तरी अनाठायी वाटली आणि त्यामुळे मी अस्वस्थ होतो.

त्यातच आज संध्याकाळी पिंपरी चिंचवड परिसरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि इतर काही नागरी संस्थांचे पदाधिकारी मला भेटून गेले आणि त्यांनी पोलिसांनी दाखल केलेली कलमं ही गंभीर आहेत अशी तक्रार केली. मुळात एखाद्याच्या जीवावर बेतेल अशा पद्धतीने निषेध नोंदवणं हे साफ बिनडोकपणाचं आहे, आणि माझ्या मते हा निषेध नाही तर तो स्टंट असतो. ह्याची जाणीव मी त्या प्रतिनिधींना करून दिली. पण असो, निषेधकर्त्यांच्या वतीने ह्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मला विनंती केली की, मी ह्या प्रकरणात मध्यस्थी करावी, कारण ही कलमं कायम राहिली तर ह्या कार्यकर्त्यांचं आयुष्य उध्वस्त होईल.

म्हणून मी स्वतः चंद्रकांत दादांशी बोललो, त्यांच्या कानावर ह्या सगळ्यांचं म्हणणं घातलं. त्यावर त्यांनी माझ्या विनंतीचा मान ठेवत ३०७ सारखं कलम शिथिल करण्याची तयारी दाखवली. तसंच माझं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांच्याशी देखील बोलणं झालं. पोलिसांवरच निलंबन मागे घेऊन, त्यांना पुन्हा सेवेत घ्यावं अशी विनंती मी त्यांना केली, ज्याला त्यांनी तात्काळ होकार दिला. ह्यासाठी दोघांचे मनापासून आभार.

पण माझी महाराष्ट्रातील तमाम राजकीय कार्यकर्त्यांना विनंती आहे की, निषेध जरूर नोंदवा पण सवंग प्रसिद्धीसाठी असं काहीही करू नका, जे एखाद्याच्या जीवावर बेतेल. ह्या प्रकरणातून इतका धडा जरी सगळ्यांनी घेतला तरी पुरेसं आहे. महाराष्ट्राची राजकीय परंपरा सुसंस्कृत आहे, त्याचा दाखला आज ह्या दोन नेत्यांनी दाखवला, आता इतरांनी पण तो कृतीतून दाखवावा हीच अपेक्षा.

आपला नम्र,

राज ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.