ठाकरेंची अडचण वाढवणार 5 मिनिटांची सुनावणी? शिंदेंचा मोठा दावा
शिवसेना कुणाची यावर आज निवडणूक आयोगात ठाकरे विरुद्ध शिंदे गटाची सुनावणी पार पडली. जवळपास पाच ते सात मिनिटच ही सुनावणी झाली, पण या सुनावणीदरम्यान शिंदे गटाने मोठा दावा केला. विधानसभेची ताकद आणि मूळ राजकीय पक्षाची ताकद दोन्ही आपल्या पाठीशी आहे, असा युक्तीवाद शिंदे गटाकडून निवडणूक आयोगापुढे करण्यात आला.
मुंबई महापालिकेने तब्बल 150 कोटींचा भूखंड गमावला; काँग्रेसचा गंभीर आरोप
मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे सुमारे 150 कोटी रूपयांचा भूखंड गमवावा लागला आहे. सोमवारी मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी सुनावणी घेतल्यानंतर मुंबई महापालिकेला मोठा दणका दिला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी जाणुनबुजून वेळकाढूपणा केला. जेणेकरुन जमीन मालकाला फायदा होईल, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी होते की नाही? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मारक बंद, शिवकालीन शस्त्रांवरही साचली धूळ!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिक महापालिकेत सत्ता असताना त्यांनी नाशिकमध्ये भव्य बाळासाहेब ठाकरे स्मारक, शस्त्र संग्रहालयाची निर्मिती केली होती. दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अनेक शिवकालीन शस्त्र या संग्रहालयात ठेवण्यासाठी दिली होती. त्यानंतर दिवसातच या शस्त्र संग्रहालयाची दुरवस्था झाली आहे. सध्या हे शस्त्र संग्रहालय धूळखात पडून असून याला जबाबदार तत्कालीन सत्ताधारी भाजप, शिवसेना असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.नाशिक हे ऐतिहासिक,धार्मिक शहर आहे.या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.त्यामुळे शहरात शिवकालीन शस्त्र संग्रहालय उभारण्याची राज ठाकरेंची इच्छा होती. महापालिकेत मनसेची सत्ता असल्यामुळे त्यांनी तात्काळ हे शस्त्र संग्रहालय उभारण्याचा विचार केला. बाबासाहेब पुरंदरे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी देखील आपल्याकडील शिवकालीन शस्र देण्यास कबुली दिली. काही दिवसातच हे शस्त्र संग्रहालय उभं राहिलं.
5 कोटींची उलाढाल ठप्प!, कधी सुरू होणार जनावरांचा बाजार ?
सांगली जिल्ह्यात लम्पी त्वचारोग आजाराने हजारो जनावरे दगावली आहेत. तर आजही शेकडो जनावरांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे बाजार बंद आहेत. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत मिरज आणि आटपाडीमध्ये जनावरांच्या बाजाराची कोट्यावधीची उलाढाल ठप्प झाली आहे. यात शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीचे मोठे नुकसान होत आहे. बाजार पुन्हा कधी सुरू होईल, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाचा प्रभाव वाढत चालल्याने जनावरांचे आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. गाय आणि म्हैसवर्गीय जनावरांत लम्पीचा प्रादुर्भाव असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, मिरज, कवठेमहांकाळ, जत, माडग्याळ येथील शेळ्यामेंढ्यांचे बाजार सुरू आहेत. मिरजेत बुधवारी जनावरांचा सर्वात मोठा बाजार भरला जातो, त्यापाठोपाठ आटपाडीमध्ये शुक्रवारी बाजार भरतो. मात्र मागील दोन महिन्यापासून हे बाजार बंद आहेत.
संजय राऊतांच्या अडचणी पुन्हा वाढणार? जवळची व्यक्ती ईडीच्या रडारवर!
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, कारण ईडी संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांची चौकशी करत आहे. प्रविण राऊत यांना ईडीने दिल्लीत वेगळ्या प्रकरणात समन्स बजावलेलं होतं. प्रविण राऊत हे पीएसीएल घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचा आरोप ईडीने केला आहे.प्रविण राऊत यांना राज्य सरकारकडून विविध मंजुऱ्या मिळवण्यासाठी एका प्रकल्पाकरता बोर्डात आणण्यात आलं होतं. मंजुरीच्या बदल्यात राऊत यांना कंपनीकडून एफएसआय मिळणार होता. या अनुषंगाने ईडी चौकशी करत आहे, या चौकशीसाठी ईडीने दिल्लीतून प्रविण राऊत यांना समन्स बजावलं आहे.
भारतीय नौदलाकडून महिलांना मोठ्ठं गिफ्ट; स्पेशल फोर्सेसमध्ये सामील होण्याची परवानगी
भारतीय नौदलाने ऐतिहासिक निर्णय घेत महिलांसाठी खास गिफ्ट दिलं आहे. इतिहासात प्रथमच महिलांना स्पेशल फोर्समध्ये सामील होण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे आता महिलाही उच्चभ्रू स्पेशल फोर्समध्ये सामील होऊ शकणार आहेत. हा असा उपक्रम आहे, ज्याद्वारे प्रथमच महिला तिन्ही सैन्यात कमांडो म्हणून काम करू शकणार आहेत.या निर्णयाची माहिती असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तिन्ही सैन्यदलांमध्ये महिला आधीच वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत तिचे कमांडो होणे हे देशातील महिला सक्षमीकरणासाठी एक नवे पाऊल ठरेल. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या स्पेशल फोर्समध्ये काही उत्तम सैनिकांचा सहभाग असतो. त्यांना कठोर प्रशिक्षणातून जावे लागते. स्पेशल फोर्सेसच्या या कमांडोमध्ये कोणत्याही परिस्थितीत वेगाने काम करण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळेच त्यात सुरुवातीपासून केवळ पुरुषांनाच स्थान दिले जात होते. मात्र आता महिलाही पुरुषांहून मागे नाहीत त्यामुळे महिलांनाही सामील करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात लवकरच नवी टोल सिस्टीम? कॅमेरांमुळे वाचणार प्रवासाचा वेळ
केंद्र सरकार लवकरच नवीन टोल सिस्टिम आणणार आहे. सध्या फास्टटॅगवरून टोल जमा करण्याच्या सिस्टिमचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये लवकरच बदल करण्यात येत असुन एका नवी सिस्टिम अंमलात आणण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडुन कॅमेरावर आधारित टोल जमा करण्याच्या पद्धतीचा विचार सुरू आहे. या कॅमेऱ्यांना ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर’ (ANPR) म्हणून ओळखले जाईल.कॅमेऱ्यावर आधारित या टोल जमा करण्याच्या पद्धतीचे मुख्य कारण नागरिकांचा टोल प्लाझावरील वेळ वाचवणे हा आहे. सध्या भारतातील ९७ टक्के टोल प्लाझावर फास्टटॅगचा वापर केला जातो. पण तरीही नागरिकांना या टोल प्लाझावर होणाऱ्या गर्दीला सामोरे जावे लागते. टोल प्लाझावर एएनपीआर सेट केल्याने कदाचित ही गर्दी जमा होणार नाही आणि नागरिकांचा वेळ वाचेल अशी शक्यता सरकारने व्यक्त केली आहे.
लवकरच देशात ‘सिंगल सिगारेट विक्री’वर बंदी? मोदी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत?
सुट्या सिगारेट विक्रीवर म्हणजेच सिंगल सिगारेट सेलवर केंद्र सरकार बंदी घालण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. संसदेच्या स्थायी समितीने देशातील तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर मर्यादा आणण्याच्या दृष्टीकोनातून यासंदर्भातील शिफारस सरकारकडे केली असल्याचं वृत्त अनेक वृत्तपत्रांनी दिलं आहे.संसदेच्या स्थायी समितीने संसदेला सादर केलेल्या अहवालामध्ये एकल सिगारेट विक्रीवर निर्बंध आणण्याची शिफार केली आहे. तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन कमी व्हावं या दृष्टीने हा निर्णय फायद्याचा ठरेल असं या समितीने अहवालामध्ये म्हटलं आहे. एकल सिगारेट विक्री रोखल्याने सिगारेट पिणाऱ्यांची संख्या कमी होईल असा विश्वास या समितीने अप्रत्यक्षपणे व्यक्त केला आहे.
SD Social Media
9850 60 3590