अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : श्वीऑनटेकचे वर्चस्व!

अंतिम सामन्यात जाबेऊरवर मात करत प्रथमच अमेरिकन, तर तिसऱ्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर

पोलंडच्या इगा श्वीऑनटेकने अग्रमानांकनाच्या दडपणाला न झुगारता प्रथमच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरी गटाचे जेतेपद पटकावले. हे तिच्या कारकीर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. सेरेना विल्यम्सची अखेरची स्पर्धा म्हणून अधिक चर्चेत राहिलेल्या यंदाच्या अमेरिकन स्पर्धेत श्वीऑनटेकने महिला टेनिसमधील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. तिने यंदाच्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेत उपांत्य फेरीची मजल मारली होती, तर फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. आता तिच्या रूपात अमेरिकन स्पर्धेलाही नवविजेती मिळाली.

दोन वेळा फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या श्वीऑनटेकने अंतिम सामन्यात पाचव्या मानांकित टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरचा ६-२, ७-६ (७-५) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. श्वीऑनटेकला यापूर्वी अमेरिकन स्पर्धेत चौथ्या फेरीच्या पुढे मजल मारता आली नव्हती. या वेळीही अग्रमानांकन मिळूनही विजेतेपदाच्या शर्यतीत तिला फारशी पसंती नव्हती.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणाऱ्या जाबेऊरचा पराभव केल्यानंतर श्वीऑनटेकने इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता असे सांगितले. विशेषत: या स्पर्धेपूर्वी ज्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला, ते पाहता यापेक्षा मोठे यश असूच शकत नाही, असेही तिने नमूद केले. अंतिम सामन्यात श्वीऑनटेकने अप्रतिम खेळ केला. तिने पहिला सेट चार गेमच्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र तिला संघर्ष करावा लागला. श्वीऑनटेककडे ६-५ अशी आघाडी होती आणि तिला ‘मॅच पॉइंट’ची संधी होती. परंतु, याच वेळी श्वीऑनटेकने रॅकेट बदलण्याचा निर्णय घेतला. याचा सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता. श्वीऑनटेकला हा गुण मिळवण्यात अपयश आले आणि नंतर सेटमध्येही बरोबरी झाल्यामुळे टायब्रेकर घेण्यात आला.

टायब्रेकरमध्ये जाबेऊरने खेळ उंचावला. त्यामुळे  श्वीऑनटेकला गुण मिळवणे अवघड गेले. जाबेऊर ५-४ अशी आघाडीवर होती. मात्र, श्वीऑनटेकने कमालीचा संयमी खेळ करून सलग तीन गुण मिळवत टायब्रेकरमध्ये बाजी मारताना विजेतेपदाला गवसणी घातली.

श्वीऑनटेकने कारकीर्दीत प्रथमच अमेरिकन खुली स्पर्धा जिंकली. यापूर्वी तिला चौथ्या फेरीचा टप्पाही पार करता आला नव्हता.

श्वीऑनटेकने अमेरिकन खुली स्पर्धा जिंकून वर्षांतील दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. तिने यंदा फ्रेंच खुली स्पर्धाही जिंकली. तसेच २०१६मध्ये अँजेलिक कर्बरने एका हंगामात दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या. त्यानंतर अशी कामगिरी करणारी श्वीऑनटेक पहिली महिला खेळाडू ठरली.

ओन्स जाबेऊर सलग दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाली. विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिच्यावर एलिना रायबाकिनाने मात केली होती.

५७ या वर्षी श्वीऑनटेकने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिला आजपर्यंत ६४ सामन्यांत ५७ विजय नोंदवण्यात यश आले आहे.

श्वीऑनटेकने या वर्षी दोन ग्रँडस्लॅम विजेतेपदांसह अन्य सात स्पर्धाही जिंकताना आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 

या स्पर्धेपूर्वी मी फार कशाची अपेक्षा करत नव्हते. या स्पर्धेत खेळणे आव्हानात्मक असते. न्यूयॉर्कमध्ये प्रेक्षक मोठय़ाने आवाज करतात, जल्लोष करतात. त्यामुळे लक्ष केंद्रित करणे काहीसे अवघड असते. मात्र, मानसिकदृष्टय़ा मी हे दडपण हाताळू शकले याचा अभिमान आहे. माझ्यासाठी ही सुरुवात आहे. मला बराच पल्ला गाठायचा आहे. 

– इगा श्वीऑनटेक

मी विजयासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले. मात्र, श्वीऑनटेक माझ्यापेक्षा सरस खेळली. तिने प्रत्येक गुणासाठी माझ्यासमोर आव्हान उभे केले. त्यामुळे तिने जेतेपद मिळवणे हा योग्यच निकाल आहे. मी मेहनत घेत राहीन. भविष्यात ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा मला विश्वास आहे.

– ओन्स जाबेऊर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.