श्रीलंकेला मिळाली नवी उमेद, पाकिस्तानला हरवून सहाव्यांदा पटकावला आशिया कप

गेले काही महिने देशातल्या राजकीय अस्थिरतेमुळे डळमळीत झालेल्या श्रीलंकेला नवी उमेद मिळाली आहे. श्रीलंकेत पुढचे काही दिवस जोरदार सेलिब्रेशन होईल कारण दसून शनाकाच्या लंकन संघानं दुबईच्या मैदानात मोठा पराक्रम गाजवला आहे. आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेनं पाकिस्तानचा 23 धावांनी धुव्वा उडवला आणि आशिया चषकावर तब्बल आठ वर्षांनी आपलं नाव कोरलं. त्याचबरोबर श्रीलंकेनं आशिया चषक जिंकण्याची ही आजवरची सहावी वेळ ठरली. सांघिक कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या टी20 रॅन्किंगमध्ये आठव्या नंबरवर असलेल्या श्रीलंकेनं नंबर दोनवर असलेल्या पाकिस्तानला धूळ चारली.

राजपक्षेनं रचला विजयाचा पाया

5 बाद 58 अशा परिस्थितीतून संघाला 170 धावांपर्यंत पोहोचवणारा भानुका राजपक्षे श्रीलंकेच्या विजयाचा हीरो ठरला. त्यानं 45 चेंडूत 71 धावा फटकावून संघाच्या विजयाचा पाया घातला. त्यानं संकटात सापडलेल्या श्रीलंकेला हसरंगा आणि करुणारत्नेच्या साथीनं बाहेर काढलं. त्यानं हसरंगासोबत 58 तर करुणारत्नेसह 54 धावांची अभेद्य भागीदारी साकारली. हसरंगानं 36 तर करुणारत्नेनं नाबाद 14 धावा फटकावल्या.

हसरंगा-मधुशानचा भेदक मारा

171 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेनं पाकिस्तानी फलंदाजीला सुरुवातीपासूनच वेसण घातली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या स्पर्धत पुन्हा एकदा अपयशी ठरला. पण रिझवाननं मात्र अर्धशतकी खेळी केली. पण हसरंगा आणि मधुशानच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाजांचा टिकाव लागू शकला नाही. 19.5 षटकात अख्खा संघ 147 धावात आटोपला. प्रमोद मधुशाननं 4 तर हसरंगानं 3 विकेट्स घेत श्रीलंकेला विक्रमी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

स्पर्धेत केवळ एक पराभव

दसून शनाकाच्या श्रीलंकेची स्पर्धेतली सुरुवात अतिशय खराब झाली. पहिल्याच साखळी सामन्यात अफगाणिस्ताननं श्रीलंकेचा आठ विकेट्सनी पराभव केला. पण त्यानंतर या संघानं राखेतून झेप घ्यावी तशी कामगिरी बजावली. बांगलादेशविरुद्धचा करो या मरोचा सामना जिंकून सुपर फोर फेरी गाठली. मग सुपर फोरमध्ये भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला हरवून फायनल गाठली. आणि दुबईत झालेल्या फायनलमध्येही पाकिस्तानला सलग दुसऱ्यांदा हरवून आशिया चषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.