मेक्सिकोत ज्यांचा पुतळा उभारला ते मराठमोळे पांडुरंग खानखोजे कोण होते? अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही

आपण या वर्षी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य देशवासीयांनी प्राणांची आहुती दिली. त्यापैकी काहींनी क्रांतीचा मार्ग पत्करला तर काहींनी अहिंसेचा. या स्वातंत्र्याच्या समरात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचा आपण नेहमीच सन्मानाने उल्लेख करतो. काही क्रांतीकारक, हुतात्मे मात्र सामान्य माणसांच्या विस्मरणात गेले आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सध्या कॅनडा दौऱ्यावर आहेत. 65 व्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्ससाठी ते हॅलिफॅक्सला गेले आहेत.

त्यांच्या या भेटीला महत्त्व अशासाठी आहे की या भेटीत ओम बिर्ला मेक्सिकोमध्ये जाऊन स्वामी विवेकानंद आणि क्रांतीकारक, शेतीतज्ज्ञ पांडुरंग खानखोजे यांच्या पुतळ्यांचं अनावरण करणार आहेत. खानखोजे यांनी मेक्सिकोत राहून शेतीमध्ये अनेक प्रयोग केले शेतीच्या विकासात मोठं योगदान दिलं होतं. त्यामुळे त्यांना मेक्सिकोत प्रचंड मान आहे. त्यामुळे त्यांचा पुतळा तिथे उभारला जात आहे. याबाबतचं वृत्त फर्स्ट पोस्टनं दिलं आहे.

दरम्यान टोरांटोतील भारतीय समुदायासोबत काढलेला फोटो ट्विट करत बिर्ला यांनी आपल्या प्रवासाबद्दल माहिती दिली. ‘हॅलिफॅक्समध्ये 65 व्या सीपीसीला जाताना टोरंटोत भारतीय समुदायाला भेटलो. भारताने अर्थ, विज्ञान-तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीबद्दल त्यांना सांगितलं. या मंडळींची मूळं भारतात रुजलेली असून ती कॅनडाच्या विकासात मोठं योगदान देत असल्याचं ऐकून आनंद वाटला,’ असं बिर्लांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पांडुरंग खानखोजे कोण होते, याबाबत आता सर्वांनाच उत्सुकता वाटत आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

कोण होते पांडुरंग खानखोजे?

पांडुरंग खानखोजे यांचा जन्म 1886 मध्ये वर्ध्यात झाला. त्यांना नागपुरातून उच्च शिक्षण पूर्ण केलं. खानखोजे यांची मुलगी सावित्री साव्हणे यांनी खानखोजेंचं चरित्र लिहिलंय त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे.

‘खानखोजे यांना फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धाबद्दल प्रचंड कौतुक वाटायचं. भारतात खानखोजेंच्या नेतृत्वाखालील एका गटाला समाजसुधारक स्वामी दयानंद आणि त्यांच्या आर्य समाजाच्या विचारांनी भारून टाकलं होतं,’ असं या आत्मचरित्रात लिहिलंय.

लाइव्ह हिस्ट्री इंडियाच्या म्हणण्यानुसार खानखोजे हे स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे अनुयायी होते. टिळकांच्या भेटीने खानखोजेंच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र लढा उभारण्याची प्रेरणा चेतली. टिळकांच्याच सांगण्यानुसार 1904-05 मध्ये जपानला गेले आणि ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांतीसाठी काय करता येईल याची चाचपणी केली. त्यांनी काही चिनी क्रांतिकारकांच्या भेटीही घेतल्या. त्यानंतर ते अमेरिकेत गेले.

‘अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतात त्यांनी भारतीय मजुरांसोबत काम केलं. नंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्यांना लाला हरदयाळ भेटले. हरदयाळ यांनी तिथं एक वृत्तपत्र काढलं त्या माध्यमातून देशभक्तीपर गीतं, लेख भारतीय भाषांतून प्रसिद्ध व्हायचे. गदर पार्टी सुरू होण्यासाठी हे वृत्तपत्र आणि त्यातले विचार बीजस्वरूप ठरले,’ असं त्यांच्या चरित्रात लिहिलं आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अमेरिकेत गदर पार्टीची  स्थापना झाली तिच्या संस्थापकांमध्ये खानखोजेही होते. त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र लढा उभारण्याच्या दृष्टिने त्यांना माउंट तामालपैस परिसरात स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिलं होतं. पण 1914 मध्ये पहिलं महायुद्ध झाल्यामुळे त्यांचे प्रयत्न पुढे यशस्वी होऊ शकले नाहीत.

खानखोजे यांनी 1915 मध्ये पॅरिसला जाऊन मादाम कामांची भेट घेतली होती त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या जर्मनीतील बर्लिनमधील क्रांतीकारकांच्या गटात सहभाग घेतला. रशियन राज्यक्रांतीनंतर त्यांनी रशियाला जाऊन ब्लादिमीर लेनिन यांचीही भेट घेतली होती असंही या पुस्तकात म्हटलं आहे.

मेक्सिकोवासीयांची मनं खानखोजेंनी कशी जिंकली?

पांडुरंग खानखोजे यांनी 1910 मध्ये मेक्सिकोतील मजुरांशी संवाद साधला होता. तिथल्या राज्यक्रांतीबद्दलही जाणून घेतलं होतं. ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेकडून पकडलं जाऊ नये म्हणून खानखोजे नंतरच्या काळात पुन्हा मेक्सिकोला आले.

चॅपिनगोतील नॅशनल स्कूल ऑफ अग्रिकल्चर इथं त्यांनी प्राध्यापक म्हणून काम सुरू केलं. मेक्सिकोतील त्यांच्या क्रांतिकारक मित्रांच्या मदतीने त्यांना ही नोकरी मिळाली असं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. लवकरच त्यांनी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मका आणि गव्हाचं वाण विकसित केलं. हे वाण दुष्काळातही उत्तम उत्पन्न देत तसंच रोगाप्रतिबंधकही होतं. त्यामुळे मेक्सिकोत झालेल्या हरित क्रांतीमध्ये या वाणांना प्रचंड महत्त्व प्राप्त झालं. पांडुरंग खानखोजे देशभर प्रसिद्ध झाले.

वडिलांच्या शेतीतील योगदानाबद्दल त्यांची मुलगी सावित्री त्यांच्या चरित्रात लिहितात, ‘ चांगलं वाण तयार करण्यासाठीचं संशोधन आणि अभ्यास याचा विचार केला तर खानखोजे यांनी मक्याच्या पिकावर केलेले प्रयोग हे खूपच मोठं योगदान आहे. पुढच्या काळात हरित क्रांती घडवणाऱ्या नॉर्मन बोरलॉग यांनीही या प्रयोगांचा अभ्यास केला होता. हरित क्रांतीचा भारताला प्रचंड फायदा झाला आणि एकाअर्थी भारतातील प्रत्येकाला पोटभर अन्न उपलब्ध करून देण्याचं स्वप्नच हरित क्रांतीतून पूर्ण झालं.’

स्क्रोल डॉट इनच्या वृत्तानुसार स्थानिक माध्यमांनी पांडुरंग खानखोजे यांचा ‘चॅपिनगोचे जादूगार आणि हिंदू सवंत, निसर्गाच्या मदतीने चमत्कार करणारी व्यक्ती’ अशा शब्दांत त्यांचा गौरव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.