महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली, यानंतर न्यायालयाने 5 न्यायाधिशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवलं. घटनापीठाकडे प्रकरण गेल्यानंतर गुरूवार 25 ऑगस्टला याची सुनावणी होईल, असंही सांगितलं गेलं, पण आता याबाबत पुन्हा सस्पेन्स निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टात अजूनही आजच्या सुनावणीबाबत अनिश्चितता आहे. आतापर्यंतच्या कामकाजाच्या दोन लिस्टमध्ये या याचिकांचा समावेश करण्यात आलेला नाही, त्यामुळे आज सकाळी ऐनवेळी प्रकरण सुनावणीसाठी येणार का पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आज 5 न्यायमूर्तींचे घटनापीठ आयोगाच्या कार्यवाहीबद्दल निर्णय देणं अपेक्षित आहे, पण अजूनही घटनापीठाची स्थापना करण्याचे नोटिफिकेशन निघालं नाही, त्यामुळे ही सुनावणी आज होणार का नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.
घटनापीठाकडे कोणते मुद्दे?
या प्रकरणात घटनेच्या परिशिष्ट १० अंतर्गत अपात्रता, विधानसभा अध्यक्ष, राज्यपालांचे अधिकार आदींबाबत घटनात्मक मुद्दे उपस्थित होत असल्याने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्यात येत असल्याचं, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी नमूद केले होते.