वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास अथवा जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम वाढवण्यात आली आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी व पशुधन हानी झाल्यास पूर्वी असलेल्या अर्थसहाय्याच्या तुलनेत वाढवण्याचा निर्णय राज्याच्या महसूल व वनखात्याने घेतला आहे.
वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रकमेपैकी दहा लाख रुपये तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित दहा लाख रुपयांपैकी पाच लाख रुपये पाच वर्षांसाठी मुदत ठेव व उर्वरित पाच लाख रुपये दहा वर्षांसाठी मुदत ठेव स्वरुपात राहील. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम देण्यात येईल. कायम अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये, गंभीररित्या जखमी झाल्यास एक लाख २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी खर्च देण्यात येईल. मात्र, खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे आवश्यक असल्यास त्याची मर्यादा २० हजार रुपये प्रती व्यक्ती राहील. शक्यतो शासकीय रुग्णालयातच औषधोपचार करण्याचेही शासनाने नमूद केले आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किंमतीच्या ७५ टक्के किंवा ७० हजार रुपयांपैकी कमी असणारी रक्कम देण्यात येईल. मेंढी, बकरी व इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किंमतीच्या ७५ टक्के किंवा १५ हजार रुपयांपैकी कमी असणारी रक्कम देण्यात येईल. गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजारभाव किंमतीच्या ५० टक्के किंवा १५ हजार रुपयांपैकी कमी असणारी रक्कम देण्यात येईल. गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास औषधोपचाराचा खर्च देण्यात येईल. हे औषधोपचार शासकीय पशुचिकित्सालयात करण्यात येतील. देय रक्कम मर्यादा बाजारभावाच्या २५ टक्के किंवा पाच हजार रुपये प्रति जनावर यापैकी कमी असणारी रक्कम ही नुकसान भरपाई पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारावर देण्यात येईल.