राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासात विविध घटकांतील सवलतधारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि दिवाळीच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांसह इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्मार्ट कार्ड योजनेला नोंदणी व वितरणासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासन सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाडय़ामध्ये २५ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीना आधार क्रमांकाशी निगडित असलेली स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र कोरोना संसर्ग आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक लाभार्थीना आगारात येऊन स्मार्ट कार्डासाठी नोंदणी करणे किंवा स्मार्ट कार्ड घेणे शक्य झाले नव्हते. जुलैमध्ये आषाढी एकादशीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या मागणीनुसार या योजनेला ३१ ऑगस्ट, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ दरम्यान असलेला गणेशोत्सव आणि दिवाळीच्या कालावधीतही ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड नोंदणीकरण व वितरण करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.