दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी ‘आप’च्या आमदारांची बैठक देखील केजरीवाल यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केली आहे. दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेविरोधात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह इतर आप नेत्यांच्या निवासस्थानावर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. सीबीआयच्या या छापेमारीनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. केजरीवाल सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप काही आपच्या आमदारांकडून करण्यात आला आहे.
‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर निशाणा साधला. ”आमच्या आमदारांना धमकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक आमदारांना २०-२० कोटींची ऑफर देण्यात येत आहे. हे २० कोटी घ्या, अन्यथा मनीष सिसोदियांसारखा सीबीआय कारवाईचा सामना करा” अशी धमकी दिली जात असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. ‘आप’चे आमदार अजय दत्त, संजीव झा, सोमनाथ भारती आणि कुलदीप कुमार यांना भाजपाच्या नेत्यांनी संपर्क साधल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सीबीआय आणि ईडीची भीती दाखवली जात असल्याची तक्रार काही आपच्या आमदारांनी केल्याचे अरविंद केजरिवाल यांनी म्हटले आहे. “आप सोडण्यासाठी पैशांचं आमिष दाखवलं जात आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे”, अशी प्रतिक्रिया यावर केजरीवाल यांनी दिली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानाबरोबरच ३१ ठिकाणांवर सीबीआयकडून गेल्या आठवड्यात छापेमारी करण्यात आली होती. आप सोडण्यासाठी केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याचा आरोप सिसोदियांकडून करण्यात आला होता.