सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई वारंवार सीमा प्रश्नावरून वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. मात्र दुसरीकडे शिंदे, फडणवीस सरकार हा प्रश्न संयमाने हाताळताना दिसत आहे. यावरून विरोधकांनी शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेझी झोड उठवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प का असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. विरोधकांच्या या टीकेला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार?
महाराष्ट्र, कर्नाटक वादावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार यांनी थेट पंडीत जवाहरलाल नेहरूंवर आरोप केला आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीमुळेच कर्नाटक, महाराष्ट्र सीमावाद सुरू झाला असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. नेहरू यांनी महाराष्ट्रातील मराठी भाषिक गावे कर्नाटकच्या घशात घातले. मात्र आता हा सीमावादाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे, ही लढाई आम्हीच जिंकू असं त्यांनी म्हटलं आहे.
आम्ही त्यांचे आरोप धुडकून लावतो
दरम्यान त्यांनी यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री आम्हाला इशारा देत असतील तर त्यांचा इशारा आम्ही धुककून लावू असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुनगंटीवार यांनी यापूर्वी देखील एकदा महाराष्ट्र, कर्नाटक सीमा वादावरून पंडित नेहरू यांच्यावर आरोप केला होता. नेहरू हेच सीमावादाच्या प्रश्नासाठी जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.