बिट्टा कराटेविरोधात ३१ वर्षांनी
श्रीनगर न्यायालयात धाव
काश्मीरमध्ये झालेल्या काश्मीर पंडितांच्या पलायन आणि हत्याकांडानंतर तब्बल ३१ वर्षांनी सतीश टिक्कू यांच्या कुटुंबियांनी फारुख अहमद दार म्हणजेच बिट्टा कराटेविरोधात श्रीनगर न्यायालयात धाव घेतली आहे. सतीश हे काश्मिरी पंडितांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये प्राण गमावलेले पहिले व्यक्ती होते. ३० मार्च रोजी सतीश यांच्या कुटुंबियांकडून न्यायालयामध्ये बिट्टा कराटेविरोधातील प्रकरणाची नव्याने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आलीय. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडितांचे हत्याकांड चर्चेत असतानाच ही मागणी करण्यात आलीय.
पाकिस्तानच्या निमलष्करी दलाच्या
छावणीवर हल्ला ६ जवानांचा मृत्यू
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका किल्ल्यामध्ये असलेल्या निमलष्करी दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी बुधवारी घातक हल्ला केला. या हल्ल्यात ६ जवानांचा मृत्यू झालाय, तर २२ जवान जखमी झाले आहेत. निमलष्करी दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ३ हल्लेखोरांना कंठस्नान घालण्यात यश आलं. या हल्ल्यात जखमी जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या
महागाई भत्त्यात वाढ
केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मोठी भेट देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. यावेळी डीएमध्ये (डीअरनेस अलाउन्स) ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने डीएमध्ये ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
राहुल गांधी 2024 मध्ये देशाचे
पंतप्रधान होणार : नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान होणार असल्याचं ट्विट केलं आहे. हे ट्विट केल्यानंतर नाना पटोले यांनी आज पुण्यात आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला आहे. राहुल गांधी द्रष्टे नेते असून 2024 साली ते पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. भाजप कडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे सुरू आहे, त्याला जनता कंटाळली आहे. ‘राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन आहे. 2019 च्या महामारीची सूचना राहुल गांधींनी दिली होती, पण त्यांची टिंगलटवाळी केली होती. पुढच्या काळात काँग्रेसच सांभाळू शकते म्हणून मी ट्विट केलंय, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या
निवासस्थानासमोर भाजपचे निदर्शने
काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यासाठी आलेले भाजपा नेते तेजस्वी सूर्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेजस्वी सूर्या आणि तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह भाजपा कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी तेथे पोहोचले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावरून आम आदमी पक्षाने आता भाजपवर निशाणा साधला आहे. अमित शाह यांनी तोडफोडीचे आदेश दिले होते का?, असे आप नेत्या आतिशी यांनी म्हटले आहे.
पत्रकार राणा अय्यूबला
भारत सोडण्यापासून रोखले
पत्रकार राणा अय्यूब यांना भारत सोडण्यापासून रोखण्यात आलं आहे. राणा अय्यूब लंडनसाठी निघालेल्या असताना त्यांना मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं. मनी लाँड्रिंग प्रकरणात राणा अय्यूब आरोपी असून ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. याचमुळे त्यांना लंडनला निघालेल्या विमानातून प्रवास करण्यापासून रोखण्यात आलं.
उद्धव ठाकरेंचे आभार, ते खूप चांगलं
काम करत आहेत : सुशीलकुमार शिंदे
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. “महाराष्ट्रात जे सरकार स्थापन झाले त्याबद्दल उद्धव ठाकरेंचे आभार मानायला हवेत. त्यांनी समान किमान कार्यक्रमाचा स्वीकार केला. महाराष्ट्र कशा पध्दतीने जातीय आणि धर्मवादी शक्तीपासून वाचवला पाहिजे याचं सुरेख उदाहरण आहे. त्यांचा अवलंब ते करत आहेत. ते खूप चांगलं काम करत आहेत,” अशी स्तुती सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून
अमली पदार्थ जप्त
अमली पदार्थ विरोधी विभागाच्या (एनसीबी) पथकाने रात्री कोरेगाव पार्क तसेच बावधन परिसरात कारवाई केली. या कारवाईत अमली पदार्थ जप्त करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
‘एनसीबी’च्या मुंबई कार्यालयातील पथकाला पुण्यातील कोरेगाव पार्क, बावधन परिसरातील अमली पदार्थ विक्रीबाबतची माहिती मिळाली होती. रात्री ‘एनसीबी’च्या पथकाने कोरेगाव पार्क, बावधन परिसरात छापे टाकले.
निष्काळजीपणाची हद्द! 84 वर्षीय वृद्धाला बँकेत कोंडून निघून गेले कर्मचारी, 18 तासांनंतर सुटका
प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी सरकारी कर्मचारी किंवा बँक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा अनुभव येतो. मात्र, कधी कधी हा निष्काळजीपणा नकळत एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. अशाच पद्धतीनं युनियन बँकेच्या कर्मचाऱ्यांचा अक्षरशः जीवघेणा निष्काळजीपणा समोर आला आहे. इथले बँक कर्मचारी बँकेची वेळ संपल्यानंतर चुकून एका 84 वर्षीय वृद्धाला बँकेतच ठेवून निघून गेले.बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या वृद्धाला चुकीनं बंद केल्यानंतर तब्बल 18 तासांनी त्यांची सुटका करण्यात आली. व्यापारी व्ही. कृष्णा रेड्डी असं या वृद्धाचं नाव आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास होता आणि रात्रभर काहीही खायला-प्यायला न मिळाल्यामुळं त्यांची प्रकृती खालावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी बँक उघडून त्यांना वाचवलं. त्या वेळी ते जवळपास बेशुद्धावस्थेतच गेले होते.
पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा! मुंबई हल्ल्याबाबत इम्रान खान यांच्यासमोर दिली कबुली
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची कधीही जाऊ शकते. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी एक मोठा खुलासा केला आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना रशीद यांनी 26/11 मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाबचा उल्लेख केला. भारताला कसाबचा पत्ता माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. पण पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी कसाबचा पत्ता भारताला दिला. इतकेच नाही तर नवाझ शरीफ सद्दाम हुसेन, मुअम्मर अल-गद्दाफी आणि ओसामा बिन लादेन यांसारख्या दहशतवाद्यांकडून पैसे घेत असत, असा दावाही राशिद यांनी केला आहे.
कोरोनानंतर आता आणखी एका आजाराचा ‘ताप’; लासा फिव्हर चे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली
गेली दोन वर्षं जगभरात कोरोनाने थैमान घातलं होतं. काही दिवसांपासून त्याचा प्रादुर्भाव थोडा कमी झालेला दिसतो आहे. तरी चौथ्या लाटेचं संकट घोंघावत आहे. त्यात आताआणखी एका नवीन आजाराची भर पडली आहे. हा नवीन आजारदेखील तापाशी निगडितच आहे आणि त्याचाही संसर्ग वेगाने होत आहे. या तापाचं नाव ‘लासा फीव्हर’ असं आहे. महत्त्वाचं म्हणजे याची लक्षणं कोरोनाशीच मिळतीजुळती आहेत. नायजेरियातील लोकांना लासा फीव्हरची झपाट्याने लागण होत आहे. नायजेरिया सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत त्यांच्या देशात 659 लोकांना लासा तापाची लागण झाली आहे. तर या वर्षी 88 दिवसांत लासा तापामुळे 123 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ब्रिटनमध्ये लासा तापाचे तीन रुग्ण आढळले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद मिटण्याची चिन्ह, अमित शहा करणार मध्यस्थी? भाजपच्या मोठ्या नेत्याने सांगितला फॉर्म्युला
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा वाद सुप्रीम कोर्टातही पोहोचला. बेळगाव , कारवार , निपाणी हा भाग महाराष्ट्रात यावा अशी मराठी बांधवांची मागणी आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी सातत्याने लढा देत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आणि बेळगाव प्रश्न हा विषय केवळ चर्चेचा नसून महाराष्ट्राच्या आस्मितेचा प्रश्न आहे. मात्र, कन्नडिगांकडून या भागातील मराठी बांधवांवर सातत्याने अन्याय सुरू आहे. पण आता हा महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावाद संपण्याची चिन्ह आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद लवकरच मिटण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे यात मध्यस्थी करण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालय या दोन राज्यांतही गेल्या 50 वर्षांपासून सीमावाद सुरू होता. या दोन राज्यांतील सीमावादावर अखेर तोडगा निघालेला आहे. काल (29 मार्च 2022) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आसाम आणि मेघालय यांच्यातील सीमावादावर तोडगा काढण्यासाठी केलेल्या करारावर स्वाक्षरी झाल्या आहेत.
SD social media
98 50 6035 90