भारतीय संघाचा बांगलादेशविरुद्ध दुसरा कसोटी सामना आजपासून; राहुलच्या उपलब्धतेबाबत साशंकता
पहिल्या सामन्यातील वर्चस्वपूर्ण कामगिरीनंतर भारतीय संघाचे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातही विजय मिळवत मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्याचे लक्ष्य असेल. तसेच या सामन्यात विजय मिळवत जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी आपली दावेदारी भक्कम करण्याची भारताला संधी आहे.
जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांसाठी चुरस पाहायला मिळते आहे. दक्षिण आफ्रिकेला (५४.५५ गुण सरासरी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (७६.९२) पहिल्या कसोटी सामन्यात मोठय़ा फरकाने पराभव पत्करावा लागला. गॅबा येथे झालेला हा सामना केवळ दोन दिवसांतच संपला. या पराभवाचा आफ्रिकेला फटका बसला असून त्यांची गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर भारतीय संघाने (५५.७७ गुण सरासरी) दुसरे स्थान मिळवले आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणारी भारत-ऑस्ट्रेलिया मालिका जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकते. मात्र, त्यापूर्वी बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवणेही भारतासाठी महत्त्वाचे ठरेल.
भारताचा नियमित कर्णधात रोहित शर्मा अंगठय़ाच्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकावे लागणार आहे. तसेच बुधवारी सरावादरम्यान केएल राहुलच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत साशंकता आहे. त्यालाही या सामन्याला मुकावे लागल्यास चेतेश्वर पुजारा नेतृत्वाची धुरा सांभाळेल आणि अभिमन्यू ईश्वरनला पदार्पणाची संधी मिळू शकेल.दुसरीकडे, मालिका बरोबरीत संपवण्यासाठी बांगलादेशला विजय अनिवार्य आहे. बांगलादेशच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली होती. मात्र, त्यांनी कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सुधारणा गरजेची आहे.
पुजारा, कुलदीपच्या कामगिरीवर नजर
भारतीय संघाने पहिल्या कसोटीत बांगलादेशवर १८८ धावांनी विजय मिळवला होता. भारताच्या या विजयात चेतेश्वर पुजाराने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने पहिल्या डावात ९० आणि दुसऱ्या डावात नाबाद १०२ धावांची खेळी केली होती. आतापर्यंतच्या कारकीर्दीत बांगलादेशविरुद्धच्या प्रत्येक कसोटी डावात पुजाराने किमान अर्धशतक झळकावले आहे. त्याचा दुसऱ्या कसोटीतही आपली लय राखण्याचा प्रयत्न असेल. त्याला सलामीवीर शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांची साथ मिळणे गरजेचे आहे.गोलंदाजीत चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष असेल. कुलदीपने पहिल्या सामन्याच्या दोन डावांत मिळून आठ गडी बाद केले होते.
शाकिबची गोलंदाजी करण्याची तयारी
पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी केली नव्हती. मात्र, दुसऱ्या सामन्यात तो गोलंदाजी करण्यास तयार असल्याचे बांगलादेशचे गोलंदाजी प्रशिक्षक अॅलन डोनाल्ड यांनी सांगितले. तसेच डावखुरा फिरकीपटू नसूम अहमदला पदार्पणाची संधी मिळू शकेल. बांगलादेशच्या फलंदाजीची भिस्त शाकिब, सलामीवीर झाकीर हसन, लिटन दास आणि मुशफिकूर रहीम यांच्यावर असेल. झाकीरने गेल्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दुसऱ्या डावात शतक झळकावले होते. तसेच या सामन्यात माजी कर्णधार मोमिनुल हकला पुनरागमनाची संधी मिळू शकते.
संघ
- भारत : केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू ईश्वरन, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट.
- बांगलादेश : शाकिब अल हसन (कर्णधार), महमुदूल हसन जॉय, नजमुल हसन शांटो, मोमिनुल हक, यासिर अली, मुशफिकूर रहीम, लिटन दास, नुरूल हसन, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, खालिद अहमद, झाकीर हसन, रेजाऊर रहमान राजा, नसूम अहमद.
- वेळ : सकाळी ९ वा.
- थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन ५, टेन ३ (हिंदी)