‘देशात कोरोनाचे नवे संकट आले आहे. पण राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर निर्बंध घालण्याचे सुचवले, पण उद्याच्या नववर्षाच्या स्वागताचे सोहळे, उत्सव, त्यासाठी होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण कसे करणार? भाजपचे राजकीय सोहळेही बिनबोभाट सुरूच असतात. त्यामुळे फक्त ‘भारत जोडो’ यात्रेवरच वाकडी नजर नको, असं म्हणत शिवसेनेनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाटय़ाने वाढू लागला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा गुंडाळावी, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सुचविले आहे. याच मुद्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.’तीन वर्षांपूर्वी कोरोनाचा उद्रेक उसळला असताना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना गुजरातेत बोलावून त्यांच्या सन्मानार्थ लाखो लोक गोळा करणारे तुम्हीच होता. कोरोना संसर्ग वाढतोय. अमेरिकेतून येणारे कोरोना घेऊन येतील ही भीती तेव्हा अनेकांनी व्यक्त केलीच होती. पण पंतप्रधान मोदी यांनी ऐकले काय? मग आताच कोरोनाचे असे राजकीय भय का वाटावे? चीनमध्ये कोरोनाचा कहर माजलाय हे खरे; पण याच काळात गुजरात विधानसभा निवडणुका पार पाडल्या व अगदी मतदानाच्या दिवशी आचारसंहितेची ऐशी की तैशी करत पंतप्रधान मोदी हे ‘रोड शो’ करीत मतदान केंद्रावर पोहोचले. त्या आधीही गुजरातमध्ये जागोजागी मोदी यांचे भव्य ‘रोड शो’ झाले. भारत जोडो यात्रा स्थगित करावी असे सांगणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना हे गर्दीचे रोड शो कोरोना वाढवतील असे वाटू नये, याचे आश्चर्य वाटते’ असा टोला शिवसेनेनं मांडवियांना लगावला.
‘उत्तर प्रदेशातील गंगेत कोरोनाबाधितांची प्रेते बेवारस अवस्थेत वाहताना जगाने पाहिली. गुजरातच्या इस्पितळांत व स्मशानांत रांगा लागल्या होत्या. त्या वेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला विश्वासात घेऊन कोरोना प्रोटोकॉलची माहिती देत होते. कोरोनाशी लढण्यासाठी भव्य इफ्रास्ट्रक्चर उभे करीत होते. मुंबईसारख्या शहरात भव्य जम्बो कोविड सेंटर्स नाहीतर उभीच राहिली नसती. ‘धारावी पॅटर्न’चे कौतुक तर ‘युनो’ने केले. आता ही सर्व तयारी पुन्हा एकदा करावी लागेल असे दिसते, असा सल्लाही सेनेनं सरकारला दिला.
‘बीजिंगच्या स्मशानभूमीत मृतदेहांना अंत्यसंस्कारासाठी जागा नाही. मृतदेह घेऊन आप्तांच्या रांगा लागल्या आहेत. हे चित्र भयावह आहे. चीनमध्ये जी कोरोना लाट उसळली आहे त्याचा फटका सीमेवरील राष्ट्रांना नक्कीच बसेल. संभाव्य नव्या तीन लाटांपैकी पहिली लाट सध्या चीनमध्ये आली आहे. त्यानंतर जानेवारीच्या मध्यात दुसरी लाट येईल. त्यामुळे आपल्याला सावध राहावे लागेल, असा सल्लाही सेनेनं दिला.