अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीस म्हणण्याचा चंग बांधला आहे. पण, रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी तिथे जाऊनच दाखवावे, त्यांचा चांगलाच पाहूणचार घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.
बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. आता त्यांनी थेट आमदार रवी राणा यांना उघडपणे धमकीच दिली आहे.
‘अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा कुटुंब हे नौटंकी करत असून प्रसिद्धीसाठी नाटक करीत आहेत. राणा कुटुंब निवडून आले राष्ट्रवादीच्या भरवश्यावर आता चमचेगिरी करत आहे भाजपची. असे भारतीय जनता पार्टीने या राज्यात असे बरेच भूकणारे कुत्रे सोडलेले आहेत, जसे राज ठाकरे, नारायण राणे, किरीट सॊमय्या व आता हे राणा कुटुंब हे सर्व ते आहेत, अशी विखारी टीका संजय गायकवाड यांनी केली.
तसंच, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मातोश्रीवर जाण्याची भाषा केली होती ते कधीच तिथे पोहोचू शकले नाहीत तर हे टपरु राणा कुटुंब कसे पोहचतील. ‘मातोश्री’ला शिवसैनिकाचं सुरक्षेचं कवच कुंडले आहे की कोणीही तिथे पोहोचू शकणार नाही. हे जातील तर चांगला पाहूणचार करण्यात येईल’ असा इशाराच संजय गायकवाड यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणणार
दरम्यान, आमदार रवी राणा यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीस म्हणण्यासाठी अखेर तारीख जाहीर केली आहे. 22 एप्रिलला आपण मातोश्रीवर जाणार असल्याचा इशारा राणा यांनी दिला.