महाराष्ट्रात साखर उत्पादनात 9 लाख टनांची वाढ अपेक्षित

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. चालू हंगामात ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यांदरम्यान देशातील साखर उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन  (इस्मा) यांनी साखर उत्पादनाबाबत प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर-जानेवारी महिन्यात 5.64 टक्क्यांच्या वाढीसह 1.87 कोटी टनावर पोहचू शकते. यापूर्वी इस्माने सध्याच्या साखर हंगाम 2021-22 मध्ये भारताचे एकूण साखर उत्पादन 3.05 कोटी टन होईल असे म्हटले होते.

मात्र, देशांतर्गत उत्पादनाच्या वाढत्या संकेतामुळे 3.14 कोटी टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. देशांतर्गत साखरेच्या उत्पादन वाढीमागे महाराष्ट्राचं कनेक्शन आहे. सर्वाधिक साखर कारखान्यांची संख्या असलेल्या उत्तरप्रदेशात गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात यंदाच्या हंगामात साखर उत्पादनात घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान 54 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी चार लाख टनांच्या घसरण होणार आहे. महाराष्ट्रानं यंदाच्या हंगामात साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्याअखरे महाराष्ट्रात साखरेचं उत्पादन 64 लाख टन होतं. यावर्षी साखर उत्पादनात 9 लाख टनांची वाढ अपेक्षित असून महाराष्ट्राचं साखर उत्पादन 73 लाख टनांवर पोहचणार आहे. कर्नाटकात गेल्या वर्षी साखरेचं उत्पादन  34.5 लाख टनांवरुन 38.7 लाख टनावर पोहोचू शकते.

महाराष्ट्र साखर आयुक्तालयाने यंदाच्या हंगामाची आकडेवारी जारी केली आहे. वर्ष 2021-22 हंगामात 1 फेब्रुवारी पर्यंत महाष्ट्रात एकूण 197 कारखान्यांचे गाळप सुरू आहे. यामध्ये  सहकारी सोबत खासगी कारखान्यांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंत 733.97 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन घेण्यात आलं.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सुमारे अडीच कोटी हून अधिक लोकांना साखर उद्योगातून थेट रोजगार मिळतो. साखर उद्योगातून महाराष्ट्राला वार्षिक दोन हजार कोटीहून अधिक महसूल मिळतो. महाराष्ट्रात नोंदणीकृत साखर कारखान्यांची संख्या दोनशेहून अधिक आहे. साखर कारखान्यातून वर्षाला सुमारे 12000 कोटींची उलाढाल होते. दरवर्षी साखर उत्पादनात वाढ नोंदविली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.