ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM चे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी हे सध्या प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या गाडीवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या खुणा त्यांच्या गाडीवर दिसून येत आहेत. मात्र, या हल्ल्यात सुदैवानं कुणीही जखमी झालं नाही. “काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळीबार करण्यात आला.
4 राऊंड फायर करण्यात आले. 3 ते 4 लोक होते, सर्वजण पळून गेले आणि शस्त्र तिथेच सोडून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, मात्र मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो. आम्ही सर्वजण सुखरुप आहोत”, असं ट्वीट ओवेसी यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी गोळीबाराच्या खुणा असलेला गाडीचा फोटोही शेअर केला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार ओवेसी हे मेरठमधील किठौर इथला एक निवडणूक कार्यक्रम आटोपून दिल्लीसाठी रवाना होत होते. त्यावेळी छिजारसी टोल प्लाजाजवळ 2 लोकांनी त्यांच्या गाडीवर 3-4 राऊंड फायर केले. एकूण 3 थे 4 हल्लेखोर होते. गोळीबारात ओवेसी यांच्या गाडीचं टायर पंक्चर झालं त्यामुळे ते दुसऱ्या गाडीतून निघून गेले.
एमआयएमच्या वारीस पठाण यांना काळं फासलं!
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी एमआयएमचे महाराष्ट्रातील माजी आमदार वारीस पठाण यांना काळ फासण्याची घटना इंदुरमध्ये घडली होती. वारीस पठाण यांना काळं फासल्याचा दावा करत एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. वारीस पठाण हे सध्या मध्य प्रदेशच्या इंदुरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका तरुणानं वारीस पठाण यांना काळं फासल्याचं बोललं जात आहे.
मात्र, याबाबत वारीस पठाण यांनाच विचारलं असता अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं त्यांनी सांगितलं. आपण एका दर्ग्यात गेलो होतो. तिथे चादर पेश केली. तिथे काही तरुणांनी आपलं हार घालून स्वागत गेलं. तसंच एका तरुणानं नजर लागू नये म्हणून लहान मुलांना लावतात ते काजळ लावलं होतं. पण सगळ्या इंदुरमध्ये असं काजळ लावून कसं फिरणार म्हणून मी एका ठिकाणी बसून ते धुतलं.