आज दि.१६ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

उद्धव ठाकरेंनी दंड थोपटले, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार, शिवसेना एकजीव करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे मुख्य शिवसेनेला भलंमोठं खिंडार पडले आहे. शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 39 आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेसाठी दिवसरात्र एक करणाऱ्या आमदारांची संख्या बंडखोरांमध्ये सर्वाधिक होती. उद्धव ठाकरे आता लवकरच पक्षासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. ते लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. पक्षाला मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे आता स्वत: मैदानात उतरणार आहेत. उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळावे घेणार आहेत. शिवसेना पक्षाला नवसंजीवनी देण्याचं आणि आणखी आक्रमक करण्याचं ध्येय उद्धव ठाकरे यांनी निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘बहुमत पाकीटमारीमधून मिळवलं, दोघांचं मंत्रिमंडळ म्हणजे…’ राऊतांचा घणाघात

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. या दोघांनी शपथ घेऊन दोन आठवडे झाले तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही, यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. राज्याचा कारभार बालिशपणे सुरू आहे, राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, जगात कुठे दोघांचं मंत्रिमंडळ कोणी पाहिले आहे का? दोघांचं कॅबिनेट हा चेष्टेचा विषय झाला आहे. याआधी महाराष्ट्राची अशी चेष्टा झाली नव्हती, असं राऊत म्हणाले.तसंच हे बहुमत पाकीटमारीमधून मिळवलं असल्याचा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत NDA उमेदवाराचा विजय निश्चित; तरीही फक्त ह्या कारणासाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी

राष्ट्रपतिपदाची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मुर्मू या उमेदवार आहेत. या निवडणुकीत मुर्मूंचा विजय निश्चित मानला जात असला तरी भाजपकडून गेल्या वेळेपेक्षा अधिक मतं मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. मागीलवेळी एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार आणि सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मतं मिळवण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. एकही मत बाद होऊ नये याची काळजीही यंदा घेतली जाणार आहे. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी थांबाल तर बसेल डबल तडाखा!

सध्या राज्यात पावसाने थोडीशी विश्रांती घेतली असली तरी मात्र मागच्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या, नाल्यांना पूर आला. तर अनेक धरणेही भरली आहेत. पावसामुळे निसर्गाचं रूपही खुललं आहे. अनेक पर्यटक पर्यंटन स्थळांना भेट देत आहेत. त्यातच आता पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर थांबून निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर थांबून निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेणार असाल तर जरा थांबा. कारण द्रुतगती मार्गावर थांबणं तुम्हाला महागात पडू शकते. पुणे जिल्ह्यासह मावळात मुसळधार पाऊस सुरू आहे.आता हे थांबणं त्यांना चांगलंच महागात पडू शकते. कारण असे आढळून आल्यास त्यांच्यावर MSRDC दंडात्मक कारवाई करणार आहे. अनेकदा असे थांबणे अपघाताला निमंत्रण असू शकते म्हणून दंडात्मक कारवाईचा बडगा MSRDC उगारणार आहे. तशी पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

खासदार राहुल शेवाळेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने खोटे आरोप करून खासदार राहुल शेवाळे यांना धमकाविणाऱ्या महिलेविरोधात अखेर मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सदर महीलेविरोधात साकीनाका पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरबाबत समाधान व्यक्त करून हा सत्याचा विजय आहे, अशा शब्दांत खासदार शेवाळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बंडखोरीच्या भीतीने काँग्रेसने पाच आमदारांना चेन्नईला हलवले; गोव्यात पुन्हा ऑपरेशन लोटस?

आमदार फुटण्याच्या भीतीने गोवा काँग्रेसने आपले पाच आमदार चेन्नईला पाठवले असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. तसेच गोव्या पुन्हा ऑपरेशन लोटस सुरू झाले आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, काँग्रेसने चेन्नईत पाठवलेल्या आमदारांमध्ये आमदार संकल्प अमोनकर, अल्टॉन डस्कोटा, कार्लोस अल्वेरा, रुडॉल्फ फर्नांडीस आणि युरी अलिमो यांचा समावेश आहे.

वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची दमदार कामगिरी; स्टीपलचेस, लांब उडीमध्ये दोन खेळाडू अंतिम सामन्यासाठी पात्र

वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत असून स्टीपलचेस आणि लांब उडी या खेळ प्रकारामध्ये दोन खेळाडू अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले आहेत. लांब उडीमध्ये मुरली श्रीशंकरने आठ मीटर उडी मारून हे यश मिळवले तर स्टिपलचेसमध्ये अविनाश साबळेने पात्रता फेरीमध्ये सातवे स्थान मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.ओरेगॉनमधील यूजीन येथे वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने पात्रता फेरीत दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. पात्रता फेरीमध्ये त्याने आठ मिटरची लांब उडी मारुन सातवे स्थान पटकावले. भारतीय खेळाडूंमध्ये अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू ठरला. लांब उडी या खेळ प्रकारामध्ये भारताचे जेस्वीन अल्ड्रीन आणि मोहम्मद अनीस याहिया असे आणखी दोन खेळाडू होते. मात्र जेस्वीन ७.७९ मीटरपर्यंत लांब उडी मारु शकला. तर मोहम्मदने आपल्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये ७.७३ मीटर लांब उडी मारली. या दोन्ही खेळाडूंचा गुणतालिकेत टॉप १२ खेळाडूंमध्ये समावेश नव्हता. त्यामुळे ते अंतिम सामन्यात प्रवेश करु शकले नाहीत.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.