जागतिक पुरस्कार विजेते वादग्रस्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या प्रतिनियुक्तीच्या कालावधीतील उपस्थितीच्या नोंदी नसल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले आहे. समितीने १२ मुद्दे समोर ठेवून डिसले यांची चौकशी केली असून समितीने सहा निष्कर्ष अहवालात मांडले आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) येथील प्राथमिक शाळेतून डिसले यांची बदली प्रतिनियुक्तीवर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्रात बदली झाली असतानाही नोव्हेंबर २०१७ ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत ते जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत गैरहजर राहिले आणि परितेवाडी शाळेतही शालेय कामकाज केले नाही. यासह विविध १२ मुद्दय़ांची चौकशी प्रशासनाने केली आहे. या चौकशीत डिसले यांनी ४८५ पानी खुलासा सादर केला होता, परंतु समितीचे समाधान झाले नाही.
चौकशी समितीने डिसले यांच्यावर ठपका ठेवणारे सहा निष्कर्ष काढले आहेत. डिसले यांनी वेळापूरच्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर हजर व्हावे यासाठी माढय़ाच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी परितेवाडी प्राथमिक शाळेतून कार्यमुक्त केले. तसे असूनही ते ५ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत नियुक्तीसाठी हजर झाल्याचे दिसून आले. १३ नोव्हेंबर २०१७ ते ४ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत डिसले यांनी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत कामकाज केल्याचे दिसून आले नाही.
डिसले यांनी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत एक दिवसही उपस्थित राहून ठरलेले कामकाज केले नाही. तेथील हजेरी पत्रकावरही त्यांची एकही स्वाक्षरी नाही. तसेच कोणतेही अभिलेखी पुरावे विहित नमुन्यात नाहीत. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडे मासिक दैनंदिनी उपलब्ध नाही.
डिसले यांच्या प्रतिनियुक्ती कालावधीची मुदत ३० एप्रिल २०२० रोजी संपली. ते १ मे २०२० रोजी त्यांच्या मूळ नियुक्तीच्या परितेवाडी शाळेत हजर होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात डिसले हे ६ ऑक्टोबर २०२० रोजी शाळेत हजर झाले. यावरून १३ नोव्हेंबर २०१७ ते ४ फेब्रुवारी २०१८ आणि १ मे २०२० ते ५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत डिसले यांनी कोठे काम केले, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही, असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.