महिन्याच्या सुरुवातीपासून सक्रिय झालेल्या मोसमी पावसाचा तडाखा राज्यातील शेतीला बसला आहे. सुमारे दोन लाख ३३ हजार ८९७ हेक्टरवरील खरीप हंगामातील पेरण्यांसह, नगदी पिके आणि फळबागांचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून शहरांकडे जाणारे महामार्ग कोंडल्यामुळे भाजी-पाल्याच्या पुरवठय़ावर परिणाम झाला आहे. त्यामुळे भाज्यांच्या घाऊक दरांत वाढ झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर येत्या दोन-तीन दिवसांत मुंबई-ठाण्यात किरकोळ बाजारात भाज्यांचे दर आणखी वाढण्याची भीती आहे.
संततधारेने भाजीपाल्याची आवक नाशिकमध्ये निम्म्याने कमी झाली असताना उपलब्ध होणारा माल खड्डेमय महामार्गावरील वाहतूक कोंडीतून मुंबईत वेळेत पोहोचविणे जिकीरीचे ठरत आहे. याचा विपरित परिणाम दरवाढीसह मुंबईच्या दैनंदिन भाजीपाला पुरवठय़ावर झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातूून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक होते. दोन-तीन दिवसात नाशिक बाजारातील आवक ६० ते ७० टक्क्यांनी कमी झाल्याचे समितीचे सचिव ए. जे. काळे यांनी सांगितले.
आठवडय़ाभरापूर्वी किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये प्रति किलोने विक्री होणाऱ्या भेंडी, गवार या भाज्या सध्या १०० ते १२० रुपये भावाने विकण्यात येत आहेत. इतर भाज्यांचीही २० ते ३० टक्क्यांपेक्षा अधिक भाववाढ झाली आहे. नाशिक व इतर बाजारातून मुंबई-ठाण्याला येणाऱ्या भाज्यांत ४० टक्क्यांची घट झाली आहे.