उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची फील्डिंग
शिंदे गट आणि भाजप सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पण अखेर आता उद्या मंगळवारी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळाला आहे. मंगळवारी सकाळी शिंदे गटातील आणि भाजपमधील नेत्यांना शपथ दिली जाणार आहे. भाजप आणि शिंदे गटातून काही नावं ही निश्चित झाली आहे. ज्यांना निरोप भेटला ते नेते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
राज्यमंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सर्व आमदारांना उद्या सकाळी सह्याद्री अथितिगृहात बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे. त्यासाठी सर्व आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सह्याद्री अथितिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीतच मंत्रिमंडळात कुणाची सहभाग होणार हे अधिकृत जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाकडून कोण कॅबिनेट मंत्री होणार आणि कोण राज्यमंत्री होणार हे उद्या होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
शिवसेनेची मोठी खेळी! पक्षाला जिथं पडलं मोठं खिंडार, तिथचं विरोधी पक्षनेता पद
सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला होता. याबाबात शिवसेनेकडून विधान परिषदेच्या सभापतींना पत्रही पाठवण्यात आले आहे. शिवसेनेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसही यासाठी स्पर्धेत आहे. विधानपरिषदेत शिवसेनेकडे 11 सदस्य आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 10-10 सदस्य आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती करुन विरोधीपक्षनेतेपदासाठी दावा करु शकतात, असं बोललं जात होतं. मात्र, आता विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे जाणार असल्याचं दिसत आहे. कारण, यावर विधान परीषद आमदार अंबादास दानवे यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
बॅडमिंटनमध्ये भारताची ‘सोनेरी हॅटट्रिक’, पुरुष दुहेरीतही गोल्ड मेडल
पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेनपाठोपाठ बॅडमिंटनमध्ये भारतानं आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताच्या सात्विक रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीत सुवर्णपदक पटकावलं. त्यामुळे बर्मिंगहॅममध्ये भारतानं बॅडमिंटनमध्ये सोनेरी यशाची हॅटट्रिक साजरी केली.
चिराग आणि सात्विकनं पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या बेन लेन आणि वॅन्डी सीन या जोडीचा 21-15, 21-13 असा पराभव केला
अब्दुल सत्तार गोत्यात
माजी मंत्री आणि शिंदे गटाला जाऊन मिळालेले शिवसेना आमदार अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत आले आहेत. सत्तार यांच्या मुलांची नावं टीईटीमध्ये सेवामुक्त झालेल्या बोगस शिक्षकांच्या यादीत आल्यामुळे खळबळ माजली आहे. अपात्र असताना पैसे देऊन पात्र होऊन नोकरी मिळवण्याचा हा घोटाळा आहे. अब्दुल सत्तार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत, पण या आरोपांमुळे सत्तार यांचं संभाव्य मंत्रिपद धोक्यात आलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळामध्ये सत्तार यांचं नाव आघाडीवर होतं, पण आता या घोटाळ्यात नाव आल्यामुळे त्यांचा मंत्रिपदाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
नदीच्या पुरात 14 पर्यटकांच्या कार वाहून गेल्या; अत्यंत धोकादायक रेस्क्यू ऑपरेशन
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात, बडवाहजवळील काटकूट नदीला आलेल्या पुरात 14 कार वाहून गेल्या. यातील 3 कारला बाहेर काढण्यात आले आहे. नदीतील पाणी कमी असताना, इंदूरमधील काही जण आपल्या परिवारासह सहलीवर आले होते. मात्र, त्याचवेळी नदीतील पाण्याची पातळी वाढली. अचानक वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे या लोकांना सावरायलाही वेळ मिळाला नाही.
आशिष शेलार होणार भाजपचे प्रदेशाध्यक्ष? मग चंद्रकांत पाटलांचं काय?
उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर अनेक बदल होण्याची शक्यता आहे.
यावेळी भाजपकडून 10 ते 12 मंत्री शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर शिंदे गटाकडून 6 ते 7 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे यानंतर आशिष शेलार यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशी चिन्ह आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यातील वीरपुत्राला जम्मू कश्मीरमध्ये अपघाती वीरमरण
गेल्या काही दिवसांपासून देशाचा सीमावर्ती भाग जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराकडून येथे कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. स्वातंत्र्यदिनी कुठे घातपात होऊ नये म्हणून लष्कराला अलर्ट देण्यात आला आहे. देशातील अंतर्गत प्रमुख शहरांची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत एक वाईट बातमी समोर आली आहे. जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय सैन्य दलातील जवानाला अपघाती वीरमरण आले आहे. ही बातमी समजल्यानंतर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी गावातील वीरपुत्र विपिन जनार्दन खर्चे भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार JCO पदावर कार्यरत होते. जम्मू कश्मीर येथील उदमपुरा येथे ड्युटीवरून घरी जाताना मोटरसायकल अपघातात दरीत कोसळून दुःखद निधन झाले आहे. उद्या सकाळी 8.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.
रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी भावाकडून बहिणीची हत्या
दोन दिवसांनी रक्षाबंधन आहे. मात्र, त्याआधीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या पीलीभीत येथून ही बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये रक्षाबंधनापूर्वी भावाने बहिणीची हत्या केली आहे.तर या घटनेनंतर मृताची आई विमला देवी यांनी आरोप केला की, गावकऱ्यांनी मुलाकडे तक्रार केली होती की त्यांची बहीण गच्चीवर फिरत असे. ती तरुण झाली आहे, आता तिचे लग्न करुन टाका, असेही गावकऱ्यांनी त्याच्याकडे सांगितले होते.याचा राग आल्याने भाऊ अनिलने रविवारी सायंकाळी उशिरा बहिणीला घरात बेदम मारहाण केली आणि बहिणीला पोलिसांत तक्रार करता येऊ नये म्हणून म्हणून रात्रीच तिला फासावर लटकवत तिची हत्या केली.
SD Social Media
9850 60 3590