माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार यांची सीबीआयच्या प्रमुखपदी निवड झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या बैठकीनंतर जयस्वाल यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अखेर सीबीआय संचालकपदी त्यांचीच नियुक्ती झालीय.
1985 च्या बॅचमधील जयस्वाल यांची 2 वर्षांसाठी सीबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती झालीय. पदभार स्वीकारल्यापासून ही 2 वर्षांची मुदत असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी सीबीआय संचालकाच्या स्पर्धेतील 2 नावांवर फुली मारली आहे. त्यामुळे या पदावर जयस्वाल यांची वर्णी लागण्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत बैठक घेतली होती. सीबीआयच्या संचालक निवडीसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. तब्बल 90 मिनिटे ही मिटिंग चालली. यावेळी रमन्ना यांनी एका महत्त्वाच्या नियमाचा हवाला देऊन या स्पर्धेतील दोन नावांवर फुली मारली होती.
सीबीआयच्या नव्या संचालकाच्या नियुक्तीमध्ये सहा महिन्याच्या नियमांचं पालन झालं पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांच्या निवृत्तीला केवळ सहा महिने बाकी आहेत, त्यांचाच या पोस्टसाठी विचार केला जावा, असं नियम सांगतो, असं रमन्ना यांनी सांगितलं. सरन्यायाधीशांच्या या वक्तव्याचं अधीर रंजन यांनी समर्थन केलं. तीन सदस्यांच्या पॅनलमधील दोन सदस्यांनी या नियमाची बाजू घेतली. त्यामुळे सीबीआय संचालकपदाच्या स्पर्धेतील दोन नावे बाद झाली.
कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?
सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ RAW मध्ये काम केलं आहे.
RAW मध्ये त्यांनी 9 वर्षे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली
सुबोध जयस्वाल यांच्याकडे तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास सोपवण्यात आला होता
सुबोधकुमार हे 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात सहभागी होते.
मुंबई पोलीस दलात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले आहे.
जुलै 2018 मध्ये सुबोधकुमार यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली.