महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज (26 मे) 76 वी जयंती. सासऱ्यांच्या जयंतीनिमित्त अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने खास फोटो शेअर केला आहे. बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील, अशा आशयाचं कॅप्शन जेनेलियाने दिलं आहे. जेनेलियाच्या फोटोवर अनेक जणांनी विलासरावांच्या आठवणी जागवल्या आहेत.
अभिनेत्री जेनेलिया देशमुख सोशल मीडियावर प्रचंड अॕक्टीव्ह असते. मदर्स डेला आईसोबतच सासूबाईंविषयी प्रेम व्यक्त करणारी पोस्ट असो, किंवा नवरोबा- अभिनेता रितेश देशमुखसोबत (Riteish Deshmukh) खट्याळ-मिश्किल डान्स व्हिडीओ. जेनेलियाच्या इन्स्टाग्राम-ट्विटर पोस्टची नेहमीच चर्चा असते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि वडिलांच्या जागी असलेले सासरे विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जेनेलियाने दरवर्षीप्रमाणेच खास फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
“वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा, आम्ही तुमची आठवण काढतो. बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील” असं कॅप्शन देत जेनेलियांना विलासरावांना मारलेल्या मिठीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो रितेश-जेनेलियाच्या लग्नातील असावा. रितेशनेही हा फोटो ट्विट केला आहे.
दुसरीकडे, रितेश देशमुखही नेहमीच आपल्या वडिलांच्या आठवणीना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा देत असतो. रितेशनेही लहानपणीचा फोटो शेअर करत “देवा, घड्याळाचे काटे कृपया पुन्हा उलटे फिरव. तुमची दररोज आठवण येते पप्पा” असं कॅप्शन दिलं आहे.