येत्या 1 जुनपासून पुण्यात सरसकट अनलॉक करु नका, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता एकाच झटक्यात सर्वकाही अनलॉक (Unlock) करणे योग्य ठरणार नाही. सर्व दुकाने एकाचवेळी उघडण्यास परवानगी देता कामा नये, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केले. दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता पुण्यात सरसकट अनलॉक योग्य ठरणार नाही. येत्या शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत आपण ही भूमिका मांडू, असे मोहोळ यांनी सांगितले.
पुणे शहरात रुग्णसंख्या कमी होत असली तरी तातडीने पूर्ण अनलॉक करून उपयोग नाही. त्यामुळे टप्प्याटप्याने अनलॉक करणे गरजेचे आहे. सुरुवातीला फक्त शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवायला परवानगी द्यावी. त्यानंतर हळहळू सुट द्यावी, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियम आणि निर्बंधांचे पालन करायला आम्ही तयार आहोत. पण राज्य सरकारने 1 जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी कळकळीची विनंती राज्यातील व्यापारी समाजाने ठाकरे सरकारला केली आहे.
पुणे आणि मुंबईतील व्यापाऱ्यांनीही ठाकरे सरकारकडे 1 जुनपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. 31 मे रोजी दुकाने बंद राहिल्याचा कालावधी 55 दिवसांचा होईल. त्यामुळे तब्बल 50 लाख लोकांचा रोजगार धोक्यात आहे. परिणामी राज्य सरकारने 1 जुनपासून दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे एफआरटीडब्ल्युचे अध्यक्ष विरेन शाह यांनी म्हटले होते.