चांद्रयान- ३ मोहिमेचे काम जवळपास पूर्ण झाले असून ते प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. येत्या जून-जुलै २०२३ मध्ये त्याचे प्रक्षेपण केले जाईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली.
नागपुरात आयोजित इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये ते बुधवारी पत्रकारांशी बोलत होते. डॉ. सोमनाथ म्हणाले, चांद्रयान-३ जवळपास सज्ज आहे. यासाठी आवश्यक सर्व गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. आम्ही आता योग्य वेळेची वाट बघतोय. यावर्षी जून-जुलै मध्ये प्रक्षेपण केले जाईल. चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ चा उद्देश सारखा आहे. यावेळी मात्र सुरक्षित ‘लँडींग’साठी आवश्यक घटनांचा अधिक सक्षमतेने विचार करण्यात आला आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवणे हा चांद्रयान-२ चा उद्देश होता. चांद्रयान-२ मोहिमेदरम्यान सप्टेंबर २०१९ मध्ये लँडर ‘विक्रम’ चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले होते. त्यानंतर चांद्रयान-३ ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अवकाशातील ई-कचऱ्याबद्दल ते म्हणाले, अवकाशात दोन लाख टन ई-कचरा आहे. त्याचे सुमारे २० हजार तुकडे आहेत. ही गंभीर समस्या आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताच्या अंतराळ धोरणाची लवकरच घोषणा करण्यात येईल. फेब्रुवारी २०२२ मध्ये अंतराळ धोरणाच्या पहिल्या मसुद्यावर चर्चा झाल्यानंतर, अंतराळ विभागाने त्यावर काम केले. आता हा मसुदा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला आहे. हे धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना कायद्याचे बळ हवे आहे, असे डॉ. सोमनाथ म्हणाले.
‘जी-२०’साठी इस्रोचे दोन कार्यक्रम
भारताकडे सध्या जी-२० चे अध्यक्षपद आहे. त्यानिमित्ताने देशात या समूहाचे वर्षभर कार्यक्रम होतील. यासाठी इस्रोच्या माध्यमातून दोन कार्यक्रम आखले आहेत. पहिला कार्यक्रम शिलाँगमध्ये होईल. यामध्ये राजदूतांसमोर इस्रोचे सादरीकरण केले जाईल. बंगळूरु येथे होणाऱ्या दुसऱ्या कार्यक्रमात अंतराळ तंत्रज्ञान व उद्योग यांची सांगड घालून अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबत चर्चा करणार असल्याचे डॉ. सोमनाथ म्हणाले.
अंतराळ संशोधन क्षेत्रात खासगी कंपन्यांना संधी
नवीन धोरणात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) संशोधन, विकास आणि क्षमता विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. शिवाय या क्षेत्रात खासगी संस्थांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न राहणार आहे. अनेक भारतीय खासगी कंपन्या आणि स्टार्ट-अप्स अंतराळ सहभाग सेवा देण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत. त्यासाठी केंद्र सरकार अनुकूल असल्याचे डॉ. सोमनाथ यांनी सांगितले.