राज्यपालांना ‘विचार करायला’ वर्षभर वेळच नाही.. ; विधान परिषदेच्या १२ नामनियुक्त सदस्यांबाबत निर्णय प्रलंबित

विधान परिषदेवरील १२ नामनियुक्त सदस्यांच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या नावांच्या यादीवर विचार करायला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गेल्या वर्षभरात बहुधा वेळच मिळालेला नाही. विशेष म्हणजे राज्यपालांनी आपले घटनात्मक कर्तव्य विनाविलंब पार पाडावे, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिल्यावरही राज्यपालांनी काहीच निर्णय घेतलेला नाही.

विधान परिषदेवरील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी गेल्या वर्षी ७ नोव्हेंबरला नवाब मलिक, अनिल परब आणि अमित देशमुख या महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांच्या मंत्र्यांनी संयुक्तपणे राज्यपाल कोश्यारी यांची राजभवनमध्ये भेट घेऊन सादर के ली होती. राज्य मंत्रिमंडळाने ठराव करून ही यादी राज्यपालांना सादर के ली होती. गेल्या वर्षभरात राज्यपालांनी १२ नामनियुक्त सदस्यांच्या यादीवर काहीच निर्णय घेतलेला नाही. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत स्मरण करून दिले होते; पण राज्यपालांनी काहीच दाद दिली नाही. राज्यपालांनी गेल्या वर्षभरात सरकारच्या वतीने सादर केलेली यादी फेटाळली नाही व कोणत्याही नावांबाबत आक्षेप घेतलेला नाही. राज्यपाल निर्णयच घेत नसल्याने विधान परिषदेतील १२ जागा गेले दीड वर्षे रिक्त आहेत. राज्यातील भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावरूनच राज्यपाल कोश्यारी हे १२ आमदारांच्या नियुक्तीवर निर्णय घेत नसल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप आहे.

न्यायालयाचा राज्यपालांना सल्ला

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी निकष निश्चित करावेत, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका फेटाळताना सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी, आम्ही राज्यपालांना सल्ला देणार नाही, असे स्पष्ट के ले होते. कोश्यारी हे निर्णय घेत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयाने आम्ही राज्यपालांना आदेश किं वा निर्देश देऊ शकत नाही; पण राज्यपालांनी आपले घटनात्मक कर्तव्य विनाविलंब पार पाडावे, असा सल्ला दिला होता. मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन पाठविलेल्या नावांची यादी स्वीकारावी किं वा फेटाळावी, असेही निकालपत्रात नमूद करण्यात आले होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.