टाळेबंदीनंतर राज्यात प्रथमच
पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार
करोना संसर्गाच्या टाळेबंदीनंतर राज्यात प्रथमच पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार आहे. करोनाचे सर्व नियमांचे पालन करून याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. कार्तिकी यात्रा भरावी याबाबत पूर्वीच पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सकारात्मकता दाखवली होती. त्यानंतर आता सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कार्तिकी यात्रा होणार असल्याचे स्वतंत्र आदेश पारित केले. त्यामुळे दीड वर्षांनंतर पंढरीत टाळ-मृदंग आणि हरिनामाच्या जयघोषाने नगरी पुन्हा एकदा दुमदुमून निघणार आहे. कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने निमंत्रण दिले आहे.
विरोधकांचे वागणे
द्वेषपूर्ण : पंतप्रधान मोदी
दोन वर्षांतील पहिल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत स्वीकारलेल्या राजकीय ठरावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आणि विरोधी पक्षावर “संधीवाद” आणि द्वेषपूर्ण मानसिकतेने वागण्याचा आरोप केला. या ठरावामध्ये कोविड परिस्थिती हाताळणे ते हवामान बदलाबाबत मोदींनी मांडलेली भूमिका याचं कौतुक करण्यात आलं आहे. १८ मुद्द्यांचा समावेश असलेला हा जाहीरनामा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मांडला.
सर्वात मोठी डिजिटल कंपनी पेटीएमचा
आयपीओ आज उघडला
देशातील सर्वात मोठी डिजिटल कंपनी पेटीएमचा आयपीओ आज उघडला आहे. तब्बल १८ हजार ३०० कोटी रुपयांचा हा आयपीओ देशात आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे. या अगोदर हा विक्रम दिग्गज सरकारी कंपनी कोल इंडियाच्या नावावर होता. जिचा आयपीओ २०१० मध्ये आला होता व तो १५ हजार ४७५ कोटी रुपयांचा होता. आता पेटीएमचा आयपीओ १८ हजार ३०० कोटी रुपयांचा आहे. ज्या अंतर्गत ८ हजार ३०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील.
मी हिंदू असल्यामुळे मंदिरांना
भेट देतो : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सॉफ्ट हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून टीका होत असते. याच मुद्द्यावर केजरीवाल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “मी हिंदू असल्यामुळे मंदिरांना भेट देतो आणि त्यावर कोणाचाही आक्षेप नसावा,” असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले. ते दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक मंदिरांना भेट देऊन सॉफ्ट हिंदुत्वात गुंतत आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल यांनी हे विधान केलं.
लखीमपूर खेरी प्रकरणाच्या तपासावरून
न्यायालयाने योगी सरकारला फटकारले
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी प्रकरणाच्या तपासावरून सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला चांगलंच फटकारलंय. या प्रकरणात काही खास आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचं गंभीर निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. तसेच या प्रकरणाच्या तपासाची देखरेख करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रावर ३ ऑक्टोबरला शेतकऱ्यांना गाडी चिरडल्याचा आरोप आहे. या घटनेत ४ शेतकरी आणि एका पत्रकाराचा मृत्यू झालाय. शेतकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत ३ भाजपा कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता.
तर ३१ जणांचे प्राण वाचले
असते : गोपीचंद पडळकर
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी बस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरून महाविकासआघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. सरकारने वेळेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असतील तर ३१ जणांचे प्राण वाचले असते, असं मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं. आर्यन खानची सुटका व्हावी यासाठी मुख्यमंत्री तात्काळ नवाब मलिक व गृहमंत्र्यांसोबत मिटींग घेतात. पण मराठी एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना चर्चा करायलाही वेळ नाही, असा आरोपही पडळकर यांनी केला.
मुंबई उच्च न्यायालयाने
मंत्री नवाब मलिक यांना फटकारले
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने मलिकांना मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आणि पुढील सुनावणी बुधवारी ठेवली आहे. या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना फटकारले आहे. नवाब मलिक तुम्ही उद्यापर्यंत तुमचे उत्तर दाखल करा. तुम्ही ट्विटरवर उत्तर देऊ शकत असाल तर इथेही (कोर्टात) उत्तर देऊ शकता,” असे न्यायमूर्ती जामदार म्हणाले.
प्रकरण न्यायालयात असल्याने
टिप्पणी करता येणार नाही : क्रांती रेडकर
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना त्यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यापारात गुंतलेली होती का, असा सवाल केला आहे. मलिक यांनी पुरावेही शेअर केले आहेत. त्यानंतर क्रांती रेडकरने याबाबत प्रतिक्रिया दिली. मला माहित आहे की नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटबद्दल तुम्हाला बरेच प्रश्न आहेत. मला सांगायचे आहे की या प्रकरणात माझी बहीण पीडित आहे. आमच्या कायदेशीर टीमच्या मते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. माझी बहीण मलिक यांच्या ट्विटला कायदेशीररित्या उत्तर देणार आहे. समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी संबंध नाही, असे क्रांती रेडकरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
SD social media
9850 60 3590