उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचं संभाजी नगर आणि उस्मानाबादचं धाराशीव करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला सांगितल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक घेता येत नाही, असं सांगत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय अयोग्य ठरवला, त्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी त्यांचं सरकार स्थापन होताच पुन्हा एकदा या दोन्ही शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली. आता या दोन्ही शहरांची नावं बदलण्याच्या प्रक्रियेत आहेत.
एकीकडे औरंगाबाद-उस्मानाबादचं नामांतर झालेलं नसतानाच बुलडाण्याने मात्र यात बाजी मारली आहे. आता बुलडाणा नाही तर बुलढाणा लिहावं लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतचे बदल केले आहेत.
एकेकाळी थंड हवेच ठिकाण असलेल्या आणि इंग्रजांच्या काळात जिल्हा मुख्यालय झालेल्या ” भिलठाणाचे ” कालांतराने नामकरण झालं. मात्र बुलडाणा की बुलढाणा अशी चर्चा अजूनही सुरूच होती त्यामुळे शासकीय कामकाजात कुणी बुलडाणा लिहीत होतं तर कुणी बुलढाणा ….मात्र आता यापुढे बुलढाणा असच नामकरण योग्य आहे व तसा गॅझेट मध्येही उल्लेख असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सर्व कार्यालयांना दिली आहे, त्यामुळे आता यापुढे सर्वच कार्यालयीन कामकाजात बुलडाणा ऐवजी बुलढाणा अस लिहिण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. तसा बदल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील फलकावर सुद्धा करण्यात आला आहे, त्यामुळे आता यापुढे सर्वांनी बुलडाणा ऐवजी बुलढाणा असा उल्लेख करावा लागणार आहे.