देशात सर्वात उंच शिवरायांचा पुतळा औरंगाबादेतच उभा राहिला

शहरात रात्री मोठ्या धुमधडाक्यात क्रांती चौकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. देशातला सर्वात उंच असा हा शिवरायांचा अश्वारुढ पुतळा असून या शिल्पामुळे औरंगाबादच्या वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाइन उपस्थितीत तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत या पुतळ्याचे लोकर्पण करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून हजारो शिवप्रेमी महाराजांच्या या प्रेरणादायी पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक होते.

अखेर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला याचा मुहूर्त ठरला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकर्पण करण्यात आले. क्रांती चौकात नव्याने उभारण्यात आलेला हा पुतळा ऐतिहासिक ठरणार आहेच, मात्र याआधी इथे असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचा इतिहासही मोठा रंजक आहे.

औरंगाबादमधील क्रांती चौकातील जुना पुतळा 39 वर्षांपूर्वी म्हणजेच1983 च्या काळात उभारण्यात आला होता. शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभावाचे तत्त्व पाळणारे होते. त्यामुळे भावी पिढीला त्यांचा आदर्श रहावा, या उद्देशाने पुतळा क्रांतिचौकात उभे करण्याचे ठरवण्यात आले. 1970 साली शिवजयंती महोत्सव समितीची स्थापना झाली. त्यावेळी जिल्ह्यात शिवरायांचा एकही पुतळा नव्हता.

शिवजयंती महोत्सव समितीचे तत्कालीन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार व शिवप्रेमींनी जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी तत्कालीन नगरपरिषद, जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरु केला. अखेर 1983 साली त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं. शहराचं हृदयस्थान असलेल्या क्रांती चौकात छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा साकारण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं 21 मे 1983 रोजी मोठ्या थाटा-माटात अनावरण करण्यात आलं. हा मराठवाड्यातला छत्रपती शिवरायांचा पहिला अश्वारुढ पुतळा होता.

1990 च्या दशकात औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालं. लोकसंख्या वाढली. शहर विस्तारू लागलं. क्रांती चौकात सतत वाहतूक कोंडी होऊ लागली. दरम्यानच्या काळात महाराजांच्या पुतळ्याभोवती मोठं सुशोभिकरणही करण्यात आलं. अशातच 2012 मध्ये क्रांती चौकात उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. उड्डाणपूलाचे डिझाइन अत्यंत आकर्षक होते. मात्र या पुलामुळे महाराजांचा पुतळा झाकोळला गेला. ही बाब शिवप्रेमींना खटकत होती. त्यामुळे या पुलापेक्षाही उंच पुतळा बसवण्याची मागणी मराठ आरक्षण समितीचे विनोद पाटील, अभिजित देखमुख व इतर शिवप्रेमींनी केली. सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. अखेर मनपाने 2018 मध्ये क्रांती चौकातील पुलापेक्षा उंच असा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला.

तब्बल चार वर्षानंतर अखेर क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उंच असा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला असून आज त्याचे लोकर्पण करण्यात आले. एकूण 52 फूट उंचीचा असा हा शिवरायांचा देशातील पहिलाच पुतळा आहे. पुण्याचे प्रसिद्ध शिल्पकार दीपक धोपटे यांनी हा सात टन वजनाचा पुतळा ब्रांझ धातूपासून साकारला आहे. या पुतळ्याच्या आवारातच छत्रपतींचा इतिहास सांगणारी शिवसृष्टीही साकारली जात आहे. तसेच शिवरायांच्या पुतळ्याभोवतीच्या चौथऱ्याचेही आर्किटेक्ट धीरज देशमुख यांनी सुशोभिकरण केले आहे. प्रतापगड किल्ल्याची प्रेरणा घेऊन ही रचना करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.