आज दि. १८ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

ATM मध्ये काळोख केला अन् 17 लाखांची रोकड अवघ्या काही मिनिटात केले गायब, विरारमधील घटना

मुंबई जवळील विरारमध्ये चोरट्यांनी एटीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून तब्बल 17 लाख 21 हजार रुपये लंपास केले आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेकडील गांधीचौक परिसरात नागरिक साखर झोपेत असताना पहाटे 4 च्या सुमारास एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. गांधीचौक परिसरात राजा अपार्टमेंट एसबीआय बॅंकेच एटीएम आहे. बुधवारी पहाटे 4 च्या सुमारास वर्दळ कमी असल्याची चोरट्यांनी संधी साधली.

भारताविरुद्धच्या सीरिजआधी ICC चा दक्षिण आफ्रिकन खेळाडूला धक्का, 9 महिने बंदी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जूनपासून 5 टी-20 मॅचची सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला धक्का लागला आहे. डोपिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेचा बॅटर जुबैर हमजा याला 9 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पार्लमध्ये 17 जानेवारी 2022 ला स्पर्धेदरम्यान हमजाचे नमुने घेण्यात आले होते, यामध्ये बंदी असलेला पदार्थ फुरोसेमाईडचे अंश सापडले होते. हा पदार्थ वाडाच्या प्रतिबंधीत यादीतला आहे.

20 वर्षांचा बेरोजगार तरुण ते पाटीदार समाजाचा ‘पोस्टर बॉय

हार्दिक पटेल यांनी अखेर आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. सामान्य दिसणाऱ्या हार्दिक पटेल यांच्या चेहऱ्यावर नक्कीच एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे त्यांचा जबरदस्त आत्मविश्वास. एवढी मोठी चळवळ उभी करण्याचे कौशल्य जे भल्याभल्यांना जमले नाही. काही वर्षांपूर्वी त्यांनी गुजरातमध्ये जे काही केलं ते एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. 2015 मध्ये गुजरातमध्ये पाटीदार पटेलांच्या आंदोलनाने ज्या प्रकारे संपूर्ण राज्य व्यापलं होतं, त्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. बेरोजगार असलेला हा तरुण अतिशय सामान्य कुटुंबातून आला होता. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं वीस वर्ष.

प्राजक्ता आणि तेजस्विनी टीजरवरूनच झाल्या होत्या ट्रोल; आता ट्रेलरचा ‘ राजकीय बोल्डबाजार’ पाहून मराठी वेबविश्व हादरलं!

गेले काही दिवस प्रचंड चर्चेत असलेल्या ‘रानबाजार’ या सीरिजच्या टीजर्सनी इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांच्या बोल्ड सीन्समुळे खळबळ उडाली आणि आता याच वेबसीरिजचा ऑफिशिअल ट्रेलर लाँच झाला आहे. ‘ठाकरे’ आणि ‘रेगे’ या गाजलेल्या सिनेमांनंतर अभिजित पानसे यांचं दिग्दर्शन असलेली ही वेबसिरीज प्रदर्शित होत आहे. रानबाजार ही खूपच बोल्ड आणि डार्क विषयाला हात घालणारी आहे हे ट्रेलरवरून जाणवतं.
या सिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत असणाऱ्या दोन अभिनेत्रींचा कधीही न पाहिलेला बोल्ड अंदाज बघायला मिळतोय. अर्थात अंगप्रदर्शन किंवा त्या उद्देशाने हा बोल्डनेस नसून ती कथेची गरज असल्याचं ट्रेलरवरून जाणवतो.

पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच! राज ठाकरेंची सभा रद्द

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. येत्या 21 मे रोजी राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. मात्र, पावसाच्या शक्यतेमुळे राज ठाकरे यांची सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे. मुंबई, औरंगाबादपाठोपाठ आता 21 तारखेला पुण्यात सभेचं आयोजन करण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील 3-4 दिवसांत कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता

भारतामध्ये यंदा उन्हाच्या तीव्रतेने अनेक विक्रम मोडले आहेत आणि नवे तयार केले आहेत. भयंकर उष्णतेने जीवाची काहिली होत असल्यानं लोक हैराण झाले आहेत. मात्र, राज्यातल्या अनेक भागांसाठी खुशखबर आहे. लवकरच या उन्हाच्या तडाख्यातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. अपेक्षेप्रमाणे यंदा भारतामध्ये मान्सूनचं आगमन वेळेआधीच झालं आहे. वातावरणात बदल झाल्यामुळे आता येथे नागरिकांना, शेतकर्‍यांना पावसाचे वेध लागले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता पुढील 3-4 दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची बरसात होणार आहे.

केतकी चितळेचा आजचा मुक्काम ठाणे कारागृहातच, गोरेगाव पोलिसांनी नाही घेतला ताबा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण केतकी चितळेला चांगलेच अंगलट आले आहे.न्यायालयाने आज
केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
केतकी चितळेकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला.
केतकीची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली.परंतू
जे जे रुग्णालयातून थेट ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली. केतकीला आजची रात्र कारागृहात काढावी लागणार असून वेळेअभावी ताबा गोरेगाव पोलिसांनी घेतला नाही.

मित्रांसोबत लागलेली पैज अंगलट, युवकाने पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण…

मित्रांसोबत पैज लागलेल्या मित्राला ही पैज अंगलट आल्याचा प्रकार घडला आहे. पोहण्यासाठी गेलेल्या या तरुणाचा मृत्यू झाला आहे. कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात पासून दोन किलोमीटर अंतरावरील खाणीमध्ये ही घटना घडली. दत्ता झुंबर उबाळे असे मृताचे नाव आहे.

शेतकऱ्यांना फसवल्याचे प्रकरण, नायब तहसीलदार अडकला पोलिसांच्या जाळ्यात

भिवंडीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकशाहीचा स्तंभ असलेल्या शासकीय सेवेतील अधिकाऱ्यानेच शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी एका नायब तहसीलदाराला अटक करण्यात आली आहे. विठ्ठल गोसावी असे अटक करण्यात आलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. शांतीनगर पोलिसांनी ही कारवाई केली. त्याला 23 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिली.

अतिवृष्टीनंतर रस्ते बनले तलाव, 2 कामगारांचा मृत्यू, IMD चा ऑरेंज अलर्ट

सध्या देशभरातील हवामानाची स्थिती वेगवेगळी आहे. उत्तर भारतात, काही काळापूर्वी उष्णतेनं विक्रम मोडला. दिल्लीत पारा 49 अंशांच्या पुढे गेला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने आसाममध्ये हाहाकार माजवला आहे. आता बंगळुरूमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळानंतर मंगळवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं आहे. शहरात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुडघ्यापर्यंत पाणी भरलं आहे. मंगळवारी रात्री येथे 2 मजुरांचा मृत्यू झाला. भारतीय हवामान खात्याने बुधवारी आणखी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मंगळवारी केरळच्या नऊ जिल्ह्यांसाठी आज आणि बुधवारी सात जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. म्हणजेच येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राजीव गांधी हत्येतील दोषीची सुटका झाली, त्याने तुरुंगात अभ्यास करून मिळवलं सुवर्णपदक

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींपैकी एक एजी पेरारिवलन , जो 31 वर्षांपासून तुरुंगात आहे, आता तुरुंगातून बाहेर येणार आहे. हत्येच्या कटाची कल्पना नसल्याबद्दल तो सातत्याने आपली कायदेशीर लढाई लढत होता. आता सर्वोच्च न्यायालयाकडून त्याला दिलासा मिळाला आहे. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांपैकी एक एजी पेरारिवलन याला फक्त 19 वर्षाचा असताना अटक करण्यात आली होती. 11 जून 1991 रोजी त्यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत त्यांचा हात असल्याचा आरोप होता. नंतर न्यायालयानेही त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा दिली. पेरुंबदुरच्या ज्या जाहीर सभेत राजीव गांधी यांची हत्या झाली, त्यात ज्या बॅटरी वापर करण्यात आला होता, त्याची व्यवस्था पेरारिवलन याने केली होती. तो अभियांत्रिकीचा हुशार विद्यार्थी होता. अटकेनंतर त्याने तुरुंगात शिक्षण घेतले. यामध्ये त्याला एका परीक्षेत सुवर्णपदक मिळालं आहे.

SD Social Media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.