चोपडा नगरपरिषद रुग्णालयाचा कायापालट म्हणजे म्हणजे माझ्यासाठी जन्मभुमीचे ऋण फेडण्याची संधी’’ असे प्रतिपादन एच.डी.एफ.सी. एर्गोचे अतुल सुफल गुजराथी यांनी चोपडा येथे संपन्न झालेल्या रुग्णालय पुनर्विकास कार्यक्रमात बोलतांना केले. चोपडा शहरात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत चालवल्या जाणाऱ्या नगरपरिषदेच्या रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून जुन्याच साहित्यांवर डॉक्टर रुग्णांना वैद्यकीय सेवा देत होते परंतु एच.डी.एफ.सी. एर्गो ह्या कंपनीकडून त्यांच्याच सी.एस.आर.फंडातून या रुग्णालयाचा कायापालट केला. ‘डॉक्टर फॉर यु’ संस्थेचे या कार्यात तांत्रिक सहकार्य लाभले.
शहरी व ग्रामीण भागातील स्लम एरियातील गरजू नागरिक नगरपालिकेच्या या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने या सर्वसामान्य गरीब गरजू रुग्णांना त्याच्या लाभ मिळणार आहे. या रुग्णालयात अद्ययावत नविन ऑक्सीजन प्लांट बसविण्यात आलेला आहे त्याच प्रमाणे सोलर प्लांट जनरेटर तसेच रुग्णालयाची दुरुस्ती, नवीन डिलिव्हरी रूम, ऑपरेशन बाह्यरुग्ण विभाग, पलंग, गाद्या नवजात शिशु साठी वॉर्मर, इमारतीचे डागडुजी, प्लास्टर, रंगकाम, दरवाजे, खिडक्यांची दुरुस्ती, पार्टीशन, इ.चे काम पूर्ण झालेले आहे. स्टुल, बेडसाइड टेबल, बेड साइड स्क्रिन, ड्रेसिंग ट्राली, डेस्कटॉप, डिलेव्हरी टेबल, डिझेल जनरेटर, फ्रिज, व्हिल चेअर, उंची मोजणारी स्टँड, आय.व्ही स्टँड, कॅबिनेट, ट्रे, ट्रॉली, रुग्णांसाठी बेड्स, ओटी लाईटस्, रॅक, आर.ओ.वॉटर कुलर, स्ट्रेचर, वेटिंग बेंचेस, इ. 25 वेगवेगळ्या प्रकारचे नविन साहित्यही रुग्णालयात उपलब्ध झाले आहे. या माध्यमातून रुग्णालयाला नवसंजीवनी मिळालेली आहे. शहरी व ग्रामीण तसेच आदिवासी क्षेत्रातील रुग्णांना या रुग्णालयात उत्तम सुविधा मिळणार आहे.
या अद्यावत रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा एच.डी.एफ.सी. एर्गोचे एक्सीकेटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट अतुल सुफल गुजराथी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळेस एच.डी.एफ.सी. एर्गोचे सी.एस.आर. हेड रस्की महल, ‘डॉक्टर फॉर यु’चे डॉ. साकेत झा, चोपड्याचे माजी नगराध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत बारेला, आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयातील कर्मचारी, एच.डी.एफ.सी. एर्गोचे कर्मचारी व डॉक्टर फॉर यु संस्थेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
मुळ चोपडा येथील रहिवासी असलेले व सध्या मुंबई येथे एच.डी.एफ.सी. एर्गो या कंपनीत एक्सीकेटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत असलेले अतुल सुफल गुजराथी यांनी सदर रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी लागणारी रक्कम मंजुर करुन संपुर्ण काम पुर्णत्वास नेण्यात मोलाची कामगीरी बजावली आहे. त्यांच्या या कार्यात चोपड्याचे माजी नगराध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत बारेला यांचे सहकार्य लाभले.
अतुल सुफल गुजराथी हे चोपडा येथील मुळ रहिवासी असुन त्यांचे माध्यमिक शिक्षण चोपडा येथील प्रताप विद्या मंदीर येथे व उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालय चोपडा येथे झालेले आहे. आपले मुळ गाव चोपडा शहराबद्दल सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेऊन अतुल सुफल गुजराथी यांनी त्यांच्या कपंनीकडुन सदर रुग्णालयासाठी रक्कम मंजूर करुन आणली व संपुर्ण काम पुर्णत्वास नेले. यापुर्वीही त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेंमध्ये किती अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागते ह्याची जाणिव ठेवुन चोपडा तालुक्यातील कोळंबा व माचला ह्या गावातील जि.प. शाळेंसाठी प्रत्येकी 60 – 60 लाख रुपये मंजुर करुन आणुन शाळांची पुर्नउभारणी केली आहे. अत्यंत सुंदर अशा शाळा त्यातुन बांधल्या गेल्या असुन विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, बुट, इ. सुध्दा कंपनीकडुन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.