टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचं निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंदिराचे पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती कुटुंबियांकडून मिळाली आहे. ३० जून रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राज कौशल यांनी अभिनेता म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ और ‘एंथनी कौन है’ या सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलंय. राज कौशल यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे. २७ जूनला राज आणि मंदिराने त्यांच्या मित्र परिवारासोबत वेळ घालवत पार्टी एन्जॉय केली होती. त्यानंतर राज यांच्या निधानाची अचानक बातमी आल्याने सर्वानाच मोठा धक्का बसला आहे.
अभिनेता रोहित रॉय याने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत शोक व्यक्त केलाय. तो म्हणाला, “पहाटे साडे चार वाजता राज आपल्यातून निधून गेला. त्याला हृदयविकाराचा झटका आला यावेळी तो घरीच होता. कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर रुग्णालयात नेण्याआधीच त्याने अखेरचा श्वास घेतला होता.” असं रोहित म्हणाला. दरम्यान रोहितने सोशल मीडियावर राज यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे.