भागवत तुम्हाला हे मान्य आहे का? लखीमपूरच्या घटनेवरून उद्धव ठाकरेंचा थेट सवाल; शिवसेना दसरा मेळावा
आपले पूर्वज हे एकच आहे, असं मोहन भागवत म्हणाले होते. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का, लखीमपूरमध्ये शेतकरी ठार मारले, ती माणसं काय परग्रहावरून आली आहे काय? असा खडा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारला आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये सुरू आहे. यावेळी नेहमी प्रमाणे ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता आणि बंधू भगिनींनो…असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. यावेळी हिंदुत्त्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला.’सकाळी संघाचा मेळावा झाला, मी जे काही बोलतोय याचा अर्थ असा नाही की, मी मोहन भागवत यांच्यावर टीका करत नाही. तुमचीच माणसं जर हे ऐकत नसतील तर ही मेळाव्याची थेरं करायची कशाला. हल्ली विचारांचं पायपोस कुणाला राहिलं नाही. मोहन भागवत यांचे विचार काय आहे तर आपले पूर्वज हे एकच होते. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का, लखीमपूरमध्ये शेतकरी ठार मारले, ती माणसं काय परग्रहावरून आली आहे का? एकीकडे तुम्ही हिंदूत्व म्हणजे, आम्ही कुणाचा द्वेष मत्सर करत नाही, असा विचार तुम्ही देताय पण दिवसाढवळ्या जे दिसतंय, ते मोहन भागवत तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
‘आमचं हिदुत्व म्हणजे, राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी नेहमी सांगितलं आहे, माणूस म्हणून पहिला जन्माला येत असतो, घरात असल्यावर माणूस असतो आणि जेव्हा तो घरातून बाहेर पडतो तेव्हा देश हा माझा धर्म आहे म्हणून वाटचाल करतो. त्यावेळी जर कुणी आपल्या धर्माची मस्ती घेऊन वाटेत येत असेल तर आम्ही कडवट हिंदू म्हणून उभं राहणार आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
जागतिक भूक निर्देशांक २०२१ मध्ये
भारत १०१ व्या स्थानावर
जागतिक भूक निर्देशांक (global hunger index) २०२१ मध्ये भारत ११६ देशांपैकी १०१ व्या स्थानावर आहे. यामध्ये भारत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागे आहे. २०२०मध्ये भारत या यादीत ९४व्या क्रमांकावर होता. एका वर्षात भारत सात स्थानांनी घसरला आहे. आयर्लंडची एजन्सी कन्सर्न वर्ल्डवाइड आणि जर्मनीची संस्था वेल्ट हंगर हिल्फे यांनी केलेल्या संयुक्त अहवालात भारतातील भुकेची पातळी ‘चिंताजनक’ असल्याचा उल्लेख केला आहे.
प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार
पडणार आहे असं सांगतो : पंकजा मुंडे
दसऱ्यानिमित्त भगवान गडावर आयोजित मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी पक्षातील नेत्यांना घरचा आहेर दिला, त्या म्हणाल्या, मी माझ्या पक्षाच्या लोकांनाही सांगणार आहे. प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असं सांगतो. आणि प्रत्येक सत्ताधारी आमचं सरकार खंबीर आहे सांगतो. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार यातून बाहेर पडणार आहात की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय, सरकार पडणं आणि सरकार खंबीर असणं आमचं ध्येय नाही तर जनतेसाठी काय करतात ते सांगा. राजकारणातील गुन्हेगारीकरण संपुष्टात आणताना विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात रान उठवलं होतं तेव्हा सत्तापरिवर्तन झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे,” असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.
सायकल चोरणारे नारायण राणे
मंत्री झाले : गुलाबराव पाटील
शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले अशी टीका करताना यावेळी त्यांनी आक्षेपार्ह भाषाही वापरली. “सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले. स्वार्थासाठी लोक आपला बाप बदलतात,” असं वक्तव्य त्यांनी केलं. सांगोला तालुक्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.
शेतकरी आंदोलनस्थळी हात-पाय
तोडून केली एकाची हत्या
दिल्लीच्या सिंधू सीमेवर शेतकरी आंदोलनस्थळी एका ३५ वर्षीय व्यक्तीचे हात-पाय तोडून मृतदेह पोलीस बॅरिकेटला बांधलेला आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. ही हत्या नेमकी कोणी केली आणि का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी अद्याप कारणाचा आणि गुन्हेगाराचा तपास लागला नसल्याचं म्हटलंय. मात्र, संयुक्त किसान मोर्चे नेते बलबीर सिंग यांनी या हत्येबाबात गंभीर आरोप केलाय. या युवकांची हत्या करून त्याचा मृतदेह संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य टेंटच्या जवळील बॅरिकेट्सला बांधण्यामागे निहंगा शिख समुहातील लोक असल्याचा आरोप बलबीर सिंग यांनी केलाय. निहंगा सुरुवातीपासून शेतकरी आंदोलनाला अडचणीत आणत आहेत, असंही सांगितलं.
रावण दहन कार्यक्रमात
वीस जणांना चिरडले
छत्तीसगडमध्ये रावण दहन कार्यक्रम सुरू असताना एका भरधाव कारने अनेक लोकांना चिरडलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 20 लोकांना चिरडल्याची माहिती मिळाली आहे. काही लोक जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची माहिती मिळाली आहे.
तैवानमध्ये इमारतीला लागलेल्या
आगीत ४६ जणांचा होरपळून मृत्यू
दक्षिण तैवानमध्ये निवासी इमारतीला लागलेल्या आगीत ४६ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. एका १३ मजली इमारतीला पहाटे ३ च्या सुमारास आग लागली, असे काऊशुंग शहरातील अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. इमारतीतील ५५ जणांना रुग्णालयात नेण्यात आले, ज्यात १४ जणांना मृत घोषित करण्यात आले. तर घटनास्थळी आणखी ३२ जणांचा मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी दुपारी शोध आणि बचावाचे प्रयत्न सुरू केले.
कंदाहार शहरात बॉम्बस्फोट
३२ जण ठार, ५३ जण जखमी
दक्षिण अफगाणिस्तानच्या कंदाहार शहरात बॉम्बस्फोट झाले. शुक्रवारी नमाज दरम्यान शिया मशिदीत झालेल्या या स्फोटात ३२ जण ठार झाले असून ५३ जण जखमी झाल्याची महिती मिळत आहे. या बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर, हे बॉम्बस्फोट कोणी घडवून आणले, याबद्दल अद्याप कोणतीच माहिती नाही. दरम्यान, गेल्या आठवड्यात उत्तरेकडील कुंदुज शहरातील एका मशिदीत आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली होती.
गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी
अतिरिक्त पाणी वापरास मंजुरी
मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मान्यता देऊन मराठवाड्यातील जनतेला दसऱ्याचे गिफ्ट दिले आहे. गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतूदीनुसार ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित असून त्यानंतर ६० टीएमसी पाणी वापरास मान्यता दिलेली होती. गोदावरी खोऱ्यात १९७५ च्या आधी पाणी वापर केलेला होता. पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या जलसंपदा विभागाने आता दूर केल्या आहेत.
दहावी पास विद्यार्थ्यांना
नौदलात नोकरीची संधी
मॅट्रिकसाठी नौदलात सरकारी नोकरी अर्थात 10 वी पाससाठी सरकारी नोकरी आहे. भारतीय नौदलाने एप्रिल 2022 मधल्या रिक्रूटसाठी नाविक म्हणून मॅट्रिक भरती (MR) च्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलीय. नेव्ही एमआर एप्रिल 2022 जाहिरातीनुसार निवडलेल्या उमेदवारांसाठी सुमारे 300 रिक्त जागा आहेत. 1500 उमेदवारांना लेखी चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीएफटी) साठी बोलावले जाईल. तसेच लेखी परीक्षेला बसण्यासाठी कट-ऑफ निर्धारित केले जाऊ शकते, ते प्रत्येक राज्यात भिन्न असू शकते.
फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर 2021 च्या
यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल
फोर्ब्सने 2021 साठी जगातील सर्वोत्तम नियोक्त्यांची वार्षिक यादी जाहीर केली. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर 2021 च्या यादीत भारतीय कंपन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर रिलायन्स जगभरात 52 व्या क्रमांकावर आहे. यादीत 750 बहुराष्ट्रीय आणि मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. देशातील 19 कंपन्यांनी या यादीत स्थान मिळवले. पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये ICICI बँक 65 व्या स्थानावर, HDFC बँक 77 व्या आणि HCL टेक 90 व्या स्थानावर आहे.
पोलीस पाळत ठेवत आहेत,
समीर वानखेडे यांचा आरोप
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस समन्स पाठवणार असल्याची माहिती मिळतेय. काही दिवसांपुर्वी खुद्द समीर वानखेडे यांनीच राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे आपल्यावर काही पोलीस पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. त्याच तक्रारीनंतर समीर वानखेडे यांना समन्स पाठवले जाणार आहेत. त्याच तक्रारीचा भाग म्हणून समीर वानखेडेंची चौकशी केली जाईल.
SD social media
9850 60 3590