शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना थेट केंद्र सरकारविरोधात दंड थोपाटले. मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणात ड्रग्ज, गांजा आणि अदानीवरून थेट मोदी सरकारलाच सवाल केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट मोदींविरोधातच दंड थोपटल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून केंद्र सरकारची अक्षरश: पिसे काढली. सरकारला त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकाराने प्रयत्न चालले आहेत. परवा हर्षवर्धन पाटील बोलले होते. मी तर भाजपात जाणं शक्यच नाही. मी म्हणजे ते. माझं भाजपात जाणं शक्यच नाही. माझं हे जे आहे तेच माझं घर आहे. हर्षवर्धन पाटील अनाहूतपणाने बोलून गेले की भाजपात का गेलो? खरं तर अशी जी लोकं आहेत जे भाजपात गेले आहेत ती भाजपाची ब्रँड अॅम्बेसेडर झाली पाहिजेत. टीव्हीवरती जाहिराती येतात… कोणतरी गोरा माणूस येतो… त्याचे हिंदीतील डब केलेले संवाद असतात… पहिले मुझे नींद की गोली खाकरभी नींद नहीं आती थी… दरवाजे पे टकटक होती तो रोंगटे खडे हो जाते थे… फिर किसी ने कहा तुम भाजपा मे जाओ… अब भाजपा में जाने के बाद मै कुंभकर्ण जैसा सो सकता हूँ… दरवाजेपर ठोका तोभी मैं उठता नही… अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली.
ही काय लायकीची माणसं आहेत, ते आपल्या अंगावर येत आहेत. आव्हान देत आहेत, हिंमत असेल तर अंगावर या. मी कशाला येऊ तुमच्या अंगावर? आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. पण कुणी आलं तर आम्ही सोडत नाही. आम्ही कशाला येऊ तुमच्या अंगावर? काय आहे तसं? लायकी तरी आहे का, पात्रता तरी आहे का? हीच शिकवण आम्हाला शिवरायांनी, शिवसेना प्रमुखांनी दिली आहे. पण अंगावर यायची भाषा करत असाल तर स्वत:मध्ये हिंमत आणि धमक असेल तर या. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून येऊ नका. समोरा समोर या, असा इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्रात काही घडलं तर गळा काढायचा. लोकशाहीचा खून झाला. महाराष्ट्रात काही घडलं तर गळा काढता. उत्तर प्रदेशात काय मळा फुलला काय? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
सध्या जो खेळ सुरु आहे वाट्टेल ते करायचं पण मला सत्ता पाहिजे. व्यसनाधीनता हा जो प्रकार आहे, अमली पदार्थ हा वेगळा प्रकार आहे. त्याचा नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली प्रकारच आहे. अगदी बाजार समित्यांपासून लोकसभेपर्यंत माझ्याच अमलाखाली पाहिजे हा सुद्धा एक अंमली प्रकारच आहे. या अमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार?, असा सवाल त्यांनी केला.
जणू काही संपूर्ण जगात महाराष्ट्रातच गांजा आणि चरसचा व्यापार चालला आहे असं चित्रं चाललं आहे. जी आपली संस्कृती आहे तुळशी वृंदावन आहे. हल्ली तुळशी वृंदावनला जाऊन तिकडे चरस आणि गांजांची वृंदावनं झालीत की काय असं चित्रं महाराष्ट्राचं जगात निर्माण केलं जात आहे. का करत आहात नतद्रष्टपणा? बरं केवळ महाराष्ट्रातच सापडतंय असं नाही. माझ्याकडे दोन बातम्या आहेत. मुंद्रा अदानी बंदराचा तपास करा हे कोर्टाने सांगितलं आहे. तिथे कोरोडो रुपयांचा अमली पदार्थाचा साठा सापडला आहे. आपले पोलीस काहीच करत नाही असं काही नाहीये. हे चिमूटभर गांजा हुंगत असताना माझ्या पोलिसांनी दीडशे कोटी रुपयांची ड्रग्ज मुंबईत जप्त केली आहे. तुम्ही चिमूटभर गांजा हुंगत आहात. हुंगा. कुठे हुंगायचं तिकडे हुंगा. पण माझ्या पोलिसांचं शोर्य कमी आहे. की सर्वच माफिया झालेत. कोणी तरी एक सेलिब्रिटी घ्यायचा आणि गांजा पकडला म्हणून ढोलकी बडवायची, फोटो काढून घ्यायची हे सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.