शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. या टीकेवर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्याच दिवशी शिमगा करुन टाकला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी फक्त भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली. पण राज्यातील महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ते काहीच बोलले नाहीत, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं.
“दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख अशी दोन्ही पदं एकाच ठिकाणी असलेले उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकल्यानंतर शिमगा अजून लांब आहे हे त्यांच्या लक्षात न आल्यामुळे, दसऱ्यालाच त्यांनी शिमगा करुन टाकला. संपूर्ण भाषण अतिशय लक्षपूर्ण ऐकताना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ते बोलत जरी असले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रश्नांवर हात घालतील अशी आशा होती”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना महाविकास आघाडीपेक्षा जास्त मदत केली’
“महाराष्ट्रातील महिला अत्याचार वाढत चालले आहेत त्यामध्ये नेमकं काय करणार आहेत? कायदा पेंडिंग आहे. दिशा कायदा लवकर करुन टाका. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा आक्रोश सुरु आहे. त्यावर तुम्ही काय करणार आहात? दहा हजार कोटींची फोड मांडाना. रस्ते दुरुस्त करणं, धरणं सुरक्षित करणं यासाठी तुम्ही पैसे दिले असतील तर त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा आहे? शेतकऱ्याला तुम्ही दहा हजार रुपये हेक्टर दिले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात 20400 रुपये हेक्टर आणि बागायतीला 54000 रुपये हेक्टर दिले होते, ज्याला तुम्ही 25 हजार दिलेत त्यांना देवेंद्रजींनी 75 हजार रुपये हेक्टर दिले आहेत”, असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला.
“महाराष्ट्रात दोन वादळ आले, अतिवृष्टी झाली, महिलांवर अत्याचार झाला. मोठ्या प्रमाणात समोर येणारं ड्रग्ज प्रकरण, त्याबाबतही चिमूटभर गांजा तुम्ही म्हणत आहात. याचा अर्थ गांभीर्यच नाही. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी त्यांना कदाचित लवकर शिमगा आला असं वाटल्याने आज जेवढा म्हणून केंद्र आणि भाजपच्या नावाने शिमगा करता येईल तेवढा शिमगा त्यांनी केला”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.